सोनखेड (प्रतिनिधी) – शेतजमीन विक्री करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५२ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२४ ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपी प्रकाश केशवराव केंद्रे (रा. वर्कशॉप, नांदेड) याने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीची मौजे शेलगाव (धानोरा), ता. लोहा येथील ६ हेक्टर ५ आर जमीन इस्कॉन टेम्पल मॅनेजमेंट कंपनीला विक्री करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी विविध शपथपत्रे लिहून घेत ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण ५२,९२,००० रुपये स्वीकारले. मात्र जमीन व्यवहार पूर्ण न करता आरोपीने फिर्यादी व साक्षीदारांची फसवणूक केल्याची तक्रार सुरेशराव गणेशराव रुद्रदंडवार (वय ६८, रा. सराफा बाजार, नांदेड) यांनी दिली आहे. या तक्रारीवरून सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच बीएनएस-२०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.
