भाजप महिला प्रदेश महामंत्री प्रणिताताई चिखलीकर-देवरे यांचे आवाहन; काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका *नांदेड (प्रतिनिधी) :- महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) या विषयांवरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप भाजपच्या महिला प्रदेश महामंत्री प्रणिताताई चिखलीकर-देवरे यांनी केला. महिला आरक्षण हा राजकीय विषय न मानता महिलांच्या सन्मानाचा आणि सक्षमीकरणाचा विषय म्हणून सर्व राजकीय पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. श्रुती यादवराव तुडमे यांनी उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना उत्तर देताना प्रणिताताई म्हणाल्या की, महिला आरक्षणामुळे लोकशाही कमकुवत होणार नसून लोकशाही अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होणार आहे. महिलांना केवळ विविध सुविधा देऊन चालणार नाही, तर निर्णय प्रक्रियेतही समान संधी मिळाली पाहिजे. भारतीय इतिहासात गार्गी, मैत्रेयी, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी दुर्गावती, राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्यादेवी होळकर यांसारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणामुळे महिला सक्षमपणे नेतृत्व करत असल्याचे दिसून येते. मग लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्यास विरोध का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बचत गट, कृषी तंत्रज्ञान आणि ‘ड्रोन दीदी’ यांसारख्या उपक्रमांमधून महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिला आरक्षणामुळे महिलांना धोरणात्मक निर्णय घेण्याची संधी मिळेल आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान अधिक प्रभावी होईल, असेही त्या म्हणाल्या. डिलिमिटेशन काळाची गरज लोकसंख्येतील वाढ आणि मतदारसंख्येतील बदल लक्षात घेता मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी नांदेडचे उदाहरण दिले. नांदेडमध्ये सुमारे १६ लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व एका खासदाराकडे असल्याचे सांगत लोकप्रतिनिधींवरील वाढता भार कमी करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिलिमिटेशनमुळे लोकप्रतिनिधींची संख्या वाढून नागरिकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळू शकतो, असा दावाही त्यांनी केला. अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाला धोका निर्माण होणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले. आदिवासीबहुल गडचिरोली आणि माहूर परिसरातील प्रतिनिधित्वाचा विचार करून आरक्षणाची रचना होईल, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महिला आरक्षणाला पाठिंबा दिल्याचा उल्लेख करत सर्व पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांच्या प्रश्नांवरून जोरदार चर्चा पत्रकारांनी २०२३ मध्ये संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी अद्याप का झाली नाही, असा थेट सवाल उपस्थित केला. त्यावर प्रणिताताईंनी त्यावेळी विधेयकाला सर्वांचे समर्थन असले, तरी पुढील प्रक्रियेमुळे अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगितले. विरोधकांचा डिलिमिटेशनला विरोध असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, पत्रकारांनी महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना हे दोन स्वतंत्र विषय असल्याचे स्पष्ट करत २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षणाची अंमलबजावणी का रखडली, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. तसेच २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना केल्यास त्यानंतर वाढलेल्या लोकसंख्येला प्रतिनिधित्व कसे मिळणार, असा महत्त्वपूर्ण मुद्दाही मांडला.या प्रश्नांवर पत्रकार आणि प्रणिताताई यांच्यात काही काळ चर्चा झाली. जनगणनेची अद्ययावत आकडेवारी उपलब्ध नसताना पुनर्रचनेची प्रक्रिया राबविण्याबाबत विरोधकांच्या आक्षेपांवरही पत्रकारांनी लक्ष वेधले. महिला आरक्षण विधेयकाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळावा आणि महिलांना राजकीय नेतृत्वाची समान संधी मिळावी, हीच भाजपची भूमिका असल्याचे सांगत प्रणिताताईंनी पत्रकार परिषदेचा समारोप केला. Kanthak Suryatal Post Views: 5 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ३० नोव्हेंबरला शहाजी उमाप साधणार नागरिकांशी थेट संवाद नोव्हेंबरला नांदेडमध्ये; नागरिकांच्या तक्रारी ऐकणार!