आजच्या आधुनिक काळात पत्रकारिता बदलली आहे, असे आपण म्हणतो. पण ती किती बदलली आहे, याचा जिवंत नमुना म्हणजे शहरातील गुन्हे शाखेचे काही व्हॉट्सअॅप ग्रुप्स. एकेकाळी जिथे गुन्ह्यांच्या बातम्यांची आणि तपासाची माहिती मिळायची, तिथे आता जी हुजूर आणि होय बापू या दोनच शब्दांचा सुकाळ झाला आहे. खऱ्या माहितीपेक्षा तिथे विशिष्ट विभागातील अधिकाऱ्यांच्या आरतीचे स्वर जास्त ऐकू येतात, ही आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होणे म्हणजे जणू एखाद्या मठात सामील होण्यासारखे झाले आहे. या मठाचे काही स्वयंघोषित क्राईमचे मोठे पत्रकार आहेत. यांच्या नजरेत पत्रकारितेची व्याख्या म्हणजे बातमी शोधणे नसून, अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार चालणे ही आहे. चुकून एखाद्या खऱ्या पत्रकाराने एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले किंवा बातमी छापली, तर हे मोठे पत्रकार लगेच सक्रिय होतात. मग सुरू होते त्या पत्रकाराचे चारित्र्यहनन आणि त्याच्यावर होणारी टीका. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवून घेणाऱ्या या क्षेत्रात, एखाद्याने विरोधी भूमिका घेतली तर त्याला थेट ग्रुपमधून बाहेर काढण्याचे हुकूमशाही तंत्र वापरले जाते. (विशेष म्हणजे यातील हुजुरेगिरीचा प्रकार रात्रीच चालतो हे अत्यंत महत्वाचे आहे.त्याचा शोध घेतला तेव्हा पाण्याचा प्रभाव चढल्यावर जास्त चांगल्या पद्धतीने हे उत्तम कार्य करता येथे.)ही पद्धत पाहून असे वाटते की, हे व्हॉट्सअॅप ग्रुप्स नसून एखाद्या सरंजामी राजवटीचे दरबार आहेत. विशेष म्हणजे, या दरबारात वावरणाऱ्या काही महाशयांची तहान मोठी अजब आहे. पत्रकाराने पत्रकारिताच करावी, गुलामी नाही असा सल्ला काही सुज्ञ लोक देतात खरे, पण ज्यांना गुलामीचीच सवय झाली आहे, त्यांना स्वातंत्र्याची चव कशी कळणार? हे महाशय घरातून बाहेर पडल्यानंतर कोणाकोणाकडून पाणी पितात, कोणाच्या आशीर्वादाने त्यांची चूल पेटते आणि कोणाच्या इशाऱ्यावर ते आपली लेखणी चालवतात, हे आता लपून राहिलेले नाही. पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या या पाणी पिण्याच्या कार्यक्रमाची चर्चा आता शहरात दबक्या आवाजात नव्हे, तर चव्हाट्यावर होऊ लागली आहे. पत्रकारिता हे आता सत्ता आणि अधिकाऱ्यांच्या जवळ जाण्याचे, त्यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थ साधून घेण्याचे माध्यम बनले आहे. समाजातील सत्य मांडण्यापेक्षा, अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण कसे घालायचे आणि त्या बदल्यात स्वतःचे उखळ पांढरे कसे करायचे, यातच काही जणांनी धन्यता मानली आहे. यालाच कदाचित आजच्या भाषेत स्मार्ट पत्रकारिता म्हणत असावेत.या स्मार्ट पत्रकारांना काल दाखल झालेला पोक्सो गुन्हा कळालाच नव्हता. या सर्व प्रकारामुळे पत्रकारितेतील नैतिकता, स्वातंत्र्य आणि निष्पक्षता आता केवळ शब्दकोशातच पाहायला मिळतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. पत्रकारितेच्या पवित्र नावाखाली चालणाऱ्या या कथित दलाली आणि हुजरेगिरी विरोधात आता उघडपणे बोलण्याची वेळ आली आहे. अन्यथा, बातमी शोधणाऱ्या पत्रकारांपेक्षा पाणी शोधणाऱ्या दलालांचीच संख्या वाढेल आणि लोकशाहीचा हा चौथा स्तंभ वाळवी लागलेल्या लाकडासारखा कोसळून पडेल. आजच्या घडीला गरज आहे ती खऱ्या पत्रकारितेची, जी कोणत्याही अधिकाऱ्याच्या दरबारात मुजरा न करता, केवळ समाजाला उत्तरदायी असेल. नाहीतर, हे हुजरे आणि त्यांचे अन्नदाते अधिकारी मिळून पत्रकारितेची उरली-सुरली अब्रूही व्हॉट्सअॅपच्या कचराकुंडीत फेकून देतील. Kanthak Suryatal Post Views: 842 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation देशाचे अर्थकारण: टॉफी, सेल्फी आणि कोलमडलेला रुपया एक गोड आर्थिक शोकांतिका ४.७० लाखांचाब्राऊन शुगर साठा जप्त; चार जण ताब्यात