भोकर (प्रतिनिधी) – उमरी पोलीस ठाण्यात दाखल खून प्रकरणात नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी नागनाथ बाळाजी मेटकर (रा. उमरी) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायाधीशांनी साक्षीपुरावे व तपासातील त्रुटींचा सखोल विचार करून हा निर्णय दिला. या प्रकरणात फिर्यादी गंगाधर राम पवार यांनी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७/२०१९ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०४, ५०६ आदी कलमानुसार तक्रार दाखल केली होती. घटनेनंतर जखमी राम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र घटनेनंतर तात्काळ आरोपीविरुद्ध मारहाणीची स्पष्ट तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती, अशी बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. सुनावणीदरम्यान फिर्यादीसह साक्षीदार मोटीराम नरसिंग टोंडवर, संतोष राम पवार, पंच गणेश शंकर मदने, पोलीस कर्मचारी तसेच तपास अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी रक्त लागलेले कपडे धुऊन काढण्यात आल्याचे साक्षीतून समोर आले. तसेच पंचनाम्यावेळी आरोपीचे नाव स्पष्टपणे सांगितले गेले नव्हते. रुग्णालयातील डेथ समरी अहवालातही मृत व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला झाल्याचा उल्लेख असल्याने आरोपीविरुद्ध ठोस पुरावा सिद्ध झाला नाही. सरकारी पक्षाला आरोपीनेच मारहाण करून मृत्यू घडवून आणल्याचे निर्विवादपणे सिद्ध करता आले नसल्याने न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. नितीन मुंडे व अॅड. सुरज शेख यांनी बाजू मांडली. Kanthak Suryatal Post Views: 885 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धर्माबाद तालुक्यात गांजाची लागवड उघड; १.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त तीव्र उष्णतेचा फटका : माळेगाव टोलनाक्याजवळ धावती कार जळून खाक