शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह हाऊसफुल्ल! उभे राहून नाटक पाहण्यासही जागा नाही; तिकीट विक्री बंद करण्याची वेळ नांदेड – महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेतील अजरामर साहित्यकृती असलेल्या वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित ‘नटसम्राट’ या दोन अंकी नाटकाला नांदेडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सादर झालेल्या या नाटकासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. प्रेक्षागृह पूर्णपणे हाऊसफुल्ल झाले. परिस्थिती इतकी उत्स्फूर्त होती की, उभे राहून नाटक पाहण्यासाठीदेखील जागा शिल्लक नव्हती. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता सभागृह क्षमता शिल्लक नसल्यामुळे नाट्य रसिकांची गैरसोय टाळण्यासाठी आयोजकांनी तिकीट विक्री बंद केली. ज्ञान विज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सौ. सुचिता देशपांडे यांनी केले. सहदिग्दर्शन डॉ. मनीष देशपांडे यांचे होते. नेपथ्याची जबाबदारी डॉ. सागर कुलकर्णी आणि अदिती देशपांडे यांनी सांभाळली, तर प्रकाशयोजना अशोक माडेकर यांनी केली. रंगभूषा व वेशभूषा अथर्व देशपांडे आणि ईश्वरी बिडकर यांनी साकारली. तर संगीत अक्षय कानोले यांनी केले. ‘नटसम्राट’ हे केवळ एका महान नटाच्या जीवनाचे चित्रण नसून माणसाचे कर्तृत्व, स्वाभिमान, अहंकार, नाती, प्रेम, त्याग आणि आयुष्याच्या उत्तरार्धात वाट्याला येणारे एकाकीपण यांचा वेध घेणारी अजरामर कलाकृती आहे. गणपतराव बेलवलकर अर्थात अप्पासाहेब यांच्या व्यक्तिरेखेतून रंगभूमीवर राज्य करणाऱ्या एका महान कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक संघर्षाचे प्रभावी दर्शन घडते. रंगभूमीवर असंख्य भूमिका साकारणारा कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात मात्र नात्यांच्या गुंत्यात आणि एकाकीपणात कसा हरवतो, याचे हृदयस्पर्शी चित्रण या नाटकातून उलगडते. अप्पासाहेबांचे कर्तृत्व, त्यांचा स्वाभिमान, रंगभूमीवरील त्यांचे साम्राज्य आणि आयुष्याच्या अखेरीस त्यांना जाणवणारी माणसांच्या सहवासाची ओढ प्रेक्षकांना अंतर्मुख करते. कावेरी आणि अप्पासाहेब यांच्यातील नात्यातून प्रेम, समर्पण आणि सहजीवनातील भावनिक बंधांचे दर्शन घडते. या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत त्रिंबक भगारे यांनी प्रभावी अभिनय केला. तसेच प्रवीण डोंगरखेडकर, रमेश पतंगे, डॉ. सौ. भाग्यश्री चिमकोडकर, सौ. संगीता राऊत, गुलाब पावडे, सौ. अंजली माडेकर, अनिल देशपांडे, कु. सई निरपणे, श्रीनिवास गुडसुरकर, डॉ. सुधीर शिवणीकर, सौ. राधिका बिडकर, सौ. दीपा निरपणे, डॉ. कृष्णानंद पाटील, गणेश भोरे आणि दीपक बिडकर यांनी विविध भूमिका साकारल्या. नाटकातील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयातून व्यक्तिरेखांना जिवंत केले. संवादफेक, भावनिक प्रसंग, नेपथ्य आणि प्रकाशयोजनेच्या प्रभावी संगमामुळे प्रयोगाला विशेष रंगत आली. प्रेक्षकांनीही प्रत्येक प्रसंगाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांच्या अभिनयाला दाद दिली. राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने नांदेडकर रसिकांचा सातत्याने सर्व नाटकांना लाभत असलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील समृद्ध नाट्यसंस्कृतीची आणि दर्जेदार रंगभूमीविषयी असलेल्या प्रेमाची साक्ष देण्यासह हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अशा नाट्य परंपरेला जनमानसात घेऊन जाण्यासाठी केलेल्या योग्य प्रसार व प्रचार याची पावती देखील ठरत आहे. दि. ३० नोव्हेंबर सोमवार रोजी ठीक सायंकाळी ७ वा.सहज सुचलं म्हणून हे नाटक सादर होणार आहे तरी नांदेडकर नाट्य रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने या नाटकांचा लाभ घेऊन नाट्य कलावंतांना प्रोत्साहित करावे असे आव्हान संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 13 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ८१५ खासदार आणि तब्बल १०० कोटींचा नवा बोजा: मामाच्या घरातून येणार का पैसा? परिसीमन बिलावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल! ज्ञानेश्वर कदम यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल; घरझडतीत २३ कागदपत्रे जप्त