जम्मू-कश्मीर, आसामनंतर आता संपूर्ण देश? परिसीमनाच्या खेळात विरोधक साफ होणार? विशेष अधिवेशनाचा बिगुल वाजतो काय, संसदीय कामकाज मंत्र्यांचे अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने दोन ट्विट येतात काय आणि अचानक दिल्लीच्या राजकीय वर्तुळात धावपळ सुरू होते! याला केवळ हेडलाईन मॅनेजमेंट म्हणून सोडून देणे ही विरोधकांची सर्वात मोठी ऐतिहासिक चूक ठरेल. संसदेच्या पटावर ज्या वेगाने सत्रावसान न झालेले सत्र १०० दिवसांनंतर घाईघाईत बोलावले गेले, त्यामागे केवळ एकच अजेंडा दिसतो परिसीमन विधेयक आणि त्याद्वारे देशाचा राजकीय भूगोल कायमचा बदलण्याचा छुपा प्रयत्न! वरवर पाहता महिला आरक्षण देऊन महिला सशक्तीकरणाचा आव आणला जात असला, तरी प्रत्यक्षात महिला आरक्षणाचा वापर हा केवळ राजकीय ढाल आणि विरोधी पक्षांची तोंडं बंद करण्यासाठी केला जात आहे. खऱ्या खेळाची सूत्रे मात्र परिसीमनाच्या बंद खोलीतील नकाशांमध्ये अडकलेली आहेत. १५ मिनिटांची घाई अन् संसदेतील ३६० चा नंबर गेम सध्या ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ५४० खासदार कार्यरत आहेत, त्यापैकी दोन खासदार तुरुंगात आहेत. राज्यघटनेत सुधारणा करणारे परिसीमन विधेयक मंजूर करण्यासाठी ३६० च्या जादूई बहुमताची गरज आहे. सत्ताधारी भाजपकडे स्वतःचे व मित्रपक्षांचे ३२० चे बळ असताना, हे ३६० चे कठीण गणित कसे पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात होता. परंतु, पडद्यामागे शिजलेल्या राजकीय शिजवणीने संपूर्ण चित्रच बदलले आहे. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेला २० खासदारांचा नवा गट एनसीपीआय, शिवसेना शिंदे गटाचे ६ खासदार, अकाली दलाचा १ खासदार, वायएसआर काँग्रेसचे समर्थन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीएमके व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींनी सरकारचा मार्ग सुकर केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांचे परिसीमन आज नाही तर उद्या होणारच, हे विधान असो की स्टालिन यांनी दिलेले सशर्त समर्थनाचे संकेत, प्रादेशिक पक्ष स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासाठी तयार झाल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे, तर ज्या ए. राजा आणि कनिमोझी यांच्यावर २जी घोटाळ्यावरून भाजपने वर्षानुवर्षे राजकीय हल्ले चढवले, त्यांनाच केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या गुप्त मांडवलीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना आपल्या ड्राय क्लिनिंग मशीनमध्ये स्वच्छ करून सत्तेचा भाग बनवण्यात भाजपचा हातखंडा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुनर्गठन की मतांचे ध्रुवीकरण? जम्मू-काश्मीर अन् आसामचे क्रूर मॉडेल परिसीमन म्हणजे केवळ मतदारसंघांची पुनर्रचना नव्हे, तर विरोधकांच्या पारंपरिक मतदारसंघांना एकाच कोपऱ्यात बांधून टाकून सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा महामार्ग तयार करणे होय. हा केवळ संशय नसून यापूर्वी जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये घडवून आणलेला प्रयोग आहे. जम्मू-काश्मीर मॉडेल: जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमनानंतर विधानसभेत भाजपचा प्रभाव असलेल्या जम्मू क्षेत्रात ३७ वरून थेट ४३ जागा करण्यात आल्या, तर मुस्लिम बहुल काश्मीर खोऱ्यात ४६ वरून केवळ एकच जागा वाढवून ४७ करण्यात आली. परिणामी, विधानसभेतील जम्मूचे प्रतिनिधित्व ४४ टक्के वरून थेट ४८ टक्के वर पोहोचले. आसाम मॉडेल: आसाममध्ये १४ लोकसभा आणि १२६ विधानसभा मतदारसंघांची रचना अशी बदलली गेली की, विरोधी पक्ष काँग्रेसच्या ३० ते ३२ वरून थेट २२ जागांवर घसरण झाली. काँग्रेस समर्थक मतदारांचे मतविभागणीच्या चक्रव्यूहात वर्गीकरण करून त्यांचे राजकीय वजनच शून्य करण्यात आले. आता हाच आसाम आणि काश्मीर पॅटर्न राष्ट्रीय स्तरावर राबवण्याचा घाट घातला जात आहे. विरोधी पक्षांचे मतदार एकत्र करून त्यांना मोजक्या १ ते २ जागांवर मर्यादित करायचे आणि उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये सामाजिक गणिते साधून सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम राखायचे, ही या बिलमागील खरी चालाकी आहे. महिला आरक्षणाची राजकीय ढाल महिला आरक्षण विधेयक आधीच संसदेत मंजूर झाले आहे. त्याला प्रत्यक्ष लागू करण्यापासून सरकारला कोणीही रोखलेले नाही. तरीही महिला आरक्षण आणि परिसीमन यांची सांगड कशासाठी घातली जात आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे विरोधकांनी परिसीमन विधेयकाला विरोध केला, तर बघा, हे पक्ष महिलांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत, असा राजकीय प्रचार करून विरोधकांची कोंडी करायची आणि जनतेच्या भावनांशी खेळायची खेळी रचली गेली आहे. हा पूर्णपणे राजकीय स्टंट असून मूळ हेतू लोकसभेच्या जागांचे आपल्या सोयीनुसार भौगोलिक पुनर्गठन करणे हाच आहे. प्रादेशिक पक्षांची आत्महत्या आणि कॉर्पोरेट एकाधिकारशाही या विधेयकाचा सर्वात भीषण फटका उत्तर आणि मध्य भारतातील प्रादेशिक पक्षांना म्हणजेच समाजवादी पक्ष, आरजेडी, तृणमूल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. मुद्यांची समाप्ती: राष्ट्रीय स्तरावरील केंद्रिकृत परिसीमनामुळे प्रादेशिक मुद्दे दुय्यम ठरतील आणि राज्यांच्या राजकारणावर केंद्र सरकारचा थेट ताबा येईल. संसाधनांची प्रचंड असमानता: एका बाजूला भाजपचे देशभरात ७०० ते ८०० वातानुकूलित सेव्हन-स्टार कार्यालये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ३०० हून अधिक कार्यालये आणि इलेक्टोरल बाँड्स व पीएम केअर्सच्या माध्यमातून मिळणारा ७० ते ८० टक्के निधी आहे. तर दुसऱ्या बाजूला निधीअभावी आणि मतदारसंघांच्या मोडतोडीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर उभे राहिलेले प्रादेशिक पक्ष आहेत. यातून देशात एक नवी कॉर्पोरेट एकाधिकारशाही निर्माण केली जात आहे. देशातील विमानतळ, बंदरे, खाणी, वीज निर्मिती, दूरसंचार आणि सॅटेलाईट बिझनेस हे सर्व अवघ्या २ ते ५ उद्योगपती मित्रांच्या घशात घातले जात आहेत. सामान्य माणसासाठी केवळ बेरोजगारी किंवा या उद्योगपतींकडे नोकरी करण्याचा पर्याय उरेल अशी व्यवस्था आखली जात आहे. शेवट दक्षिण भारतातील स्टालिन यांच्यासारखे नेते जर असे समजत असतील की, तमिळनाडूतील लोकसभेच्या जागा दुप्पट करून आणि ७ टक्के चा वाटा २५ वर्षांसाठी कायम ठेवून ते आपल्या राज्याचे हित जपत आहेत, तर तो त्यांचा मोठा भ्रम आहे. कारण एकदा का देशातील लोकशाहीची घटनात्मक चौकटच मोडून पडली आणि एकपक्षीय हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली, तर द्रविड राजकारणाचा आणि प्रादेशिक अस्मितेचा नंबर लागायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्था खिशात घालून, पैशाचा आणि धर्माचा अमर्याद वापर करून, आणि आता मतदारसंघांचा भूगोल बदलून जिंकण्याची ही रीत लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. ही केवळ एका विधेयकाची लढाई नाही, तर भारताच्या संघराज्यीय ढाच्याची आणि प्रादेशिक अस्तित्वाची अंतिम लढाई आहे! विरोधकांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या विधेयकापुढे नांगी टाकली, तर इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही! Kanthak Suryatal Post Views: 11 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ८१५ खासदार आणि तब्बल १०० कोटींचा नवा बोजा: मामाच्या घरातून येणार का पैसा? परिसीमन बिलावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल!