नांदेड (प्रतिनिधी)- पावसाळ्याच्या तोंडावर महानगरपालिकेकडून दरवर्षी नालेसफाई मोहीम राबवली जाते. मात्र यंदा ही मोहीम प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवली जात आहे, यावर डॉ. आंबेडकर नगर परिसरात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, नालेसफाईच्या नावाखाली केवळ फोटोसेशनचा दिखावा करण्यात येत असल्याचे वास्तव आज समोर आले. डॉ.आंबेडकर नगर येथे महापालिकेच्यावतीने नालेसफाईसाठी डोजर मशीन मागवण्यात आले होते. परिसरातील नागरिकांना अपेक्षा होती की, यावेळी तरी नाल्यांची सखोल सफाई होईल आणि पावसाळ्यात होणाऱ्या पाणीसाठ्याच्या समस्येतून दिलासा मिळेल. मात्र प्रत्यक्षात घडलेले चित्र वेगळेच होते. डोजर आला, काही ठिकाणी थोडेफार काम केल्याचे भासवले गेले आणि लगेचच अधिकाऱ्यांसमोर दोन-चार फोटो काढण्यात आले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, फोटोसेशन पूर्ण होताच संबंधित कर्मचारी व अधिकारी तेथून निघून गेले. त्यानंतर डोजरही परत नेण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्षात नाल्याची कोणतीही सखोल किंवा प्रभावी सफाई झाली नसल्याचे स्पष्ट झाले. हे नालेसफाईचे काम म्हणायचे की केवळ फोटोसेशन? असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या भागातील मुख्य नाला अत्यंत मोठा असून, नांदेड उत्तर भागातील सांडपाणी व घाण पाण्याची विल्हेवाट याच नाल्यातून होते. त्यामुळे या नाल्याची वेळोवेळी योग्य सफाई होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र सध्या नाल्यात गाळ साचलेला असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी तुंबून ते थेट नागरिकांच्या घरात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मागील काही वर्षांपासून हीच परिस्थिती कायम आहे. पावसाळा सुरू झाला की पाणी घरात शिरते, मालमत्तेचे नुकसान होते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तरीदेखील प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नाहीत. दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली निधी खर्च होतो, पण प्रत्यक्षात कामाचा दर्जा मात्र अत्यंत निकृष्ट राहतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महानगरपालिकेकडे संताप व्यक्त करत, तातडीने सखोल नालेसफाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून केवळ दिखावूपणा करणाऱ्या पद्धतीला आळा घालावा, अशी मागणीही होत आहे. पावसाळा अगदी दारात उभा असताना, अशी निष्क्रियता भविष्यात मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. Kanthak Suryatal Post Views: 653 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा युवा पुरस्काराने लवकुश जाधव सन्मानीत भाग्यनगर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त