नांदेड (प्रतिनिधी) – माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी घटना लोहा तालुक्यातील दापशेड येथे घडली आहे. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही, आणि अखेर हतबल झालेल्या नातेवाईकांनी पार्थिवदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवत सरण रचून आंदोलन सुरू केले. तब्बल २५ तासांपासून मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयातच ठेवण्यात आला असून या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. दापशेड गावात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या महादेव कोळी समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी करताना वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अनेक वेळा तहसील कार्यालय व ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊनही प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही. अखेर मृत्यूच्या दुःखातही न्यायासाठी लढण्याची वेळ या कुटुंबावर आली. आप्तस्वकीयांच्या डोळ्यात अश्रू, हृदयात वेदना आणि ओठांवर प्रश्न घेऊन ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरण रचले. जिवंतपणीही दुर्लक्ष, आणि मृत्यूनंतरही अपमान? असा संतप्त सवाल करत त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. या हृदयद्रावक प्रसंगामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही, अंत्यविधीसाठी जागा नसल्यामुळे त्यांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब ठरत आहे. मृत व्यक्तीलाही सन्मानाने निरोप देण्याचा हक्क आहे, अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी तातडीने स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या घटनेने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा केला असून, आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून या गावाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 803 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणातील साईलाला आणि इंगळेला चार दिवस पोलीस कोठडी स्वारातीम विद्यापीठात स्पोर्ट्स फिटनेस समर कॅम्प २०२६चे आयोजन;प्रवेशासाठी अंतिम दि. ३० एप्रिल, २०२६