हिमायतनगर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वारंगटाकळी येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, शेती कर्जाचा वाढता बोजा आणि कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली होते. मृत शेतकऱ्याचे नाव चंद्रभान दादाराव कदम (वय ६०) असे आहे. मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी त्यांनी शेतातील आखाड्यावर ठेवलेले विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नातेवाईकांच्या माहितीनुसार, चंद्रभान कदम यांच्यावर शेतीचे कर्ज होते. शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या तसेच सेतू केंद्रावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, अद्याप लाभ न मिळाल्याने ते नैराश्यात असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यांचा मुलगा निवृत्ती कदम यांनीही रुग्णालयात याबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर वारंगटाकळीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत आणि मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. मृत चंद्रभान कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी वारंगटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 516 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शासनाच्यावतीने जारी करण्यात आलेली आज पर्यंतची पावसाची स्थिती …. नांदेडचा विकास अखेर खड्ड्यात की वाळूच्या ट्रकखाली?