नवीन नांदेड (प्रतिनिधी)- सकाळी पाच वाजताच्या सुमारास अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर या ३० वर्षीय युवकाच्या खुनाने परिसरात मोठी खळबळ उडाली. खुनानंतर पोलिसांनी नेहमीप्रमाणे जलद गती दाखवत आरोपींचा शोध सुरू केला आणि काही आरोपींना तातडीने ताब्यातही घेतले. पोलिसांची ही तत्परता पाहून नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला.
मिळालेल्या तक्रारीनुसार गोलू मंगळाचे वडील तसेच इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी रोहित लोट याला भाग्यनगर पोलिसांनी त्वरित पकडले, तर गोलू मंगळाच्या वडिलांनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. मात्र मुख्य चर्चेचा विषय ठरला तो अंकुश गंधमवार नावाचा आरोपी.
स्थानिक गुन्हा शाखेला माहिती मिळाली की अंकुश गंधवार झरी परिसरात असल्याची शक्यता आहे. सायबर विभाग स्थानिक गुन्हा शाखेच्या अखत्यारीत असल्याने लोकेशनची माहिती सरळ योग्य ठिकाणी पोहोचली, असे मानले जात आहे. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर चित्रपटाला साजेसा प्रसंग घडला. आरोपीने पोलिसांना विरोध करत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली आणि… इथेच खरी कथा सुरू होते. पोलीस निरीक्षक हजर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित, संपूर्ण पथक जागेवर तरी गोळी झाडली ती पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी! त्यांनी आरोपीच्या पायावर गोळी झाडून त्याला जेरबंद केले. सध्या आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर मात्र पोलिस दलात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. पोलीस निरीक्षक उपस्थित असताना गोळीबाराची जबाबदारी उपनिरीक्षकावर का आली? निरीक्षकांची बंदूक त्या दिवशी सुट्टीवर होती का? की वरिष्ठांनीच कनिष्ठाच्या बंदुकीत गोळी भरून दिली? अशा मिश्कील प्रश्नांची देवाणघेवाण पोलिस वर्तुळात सुरू असल्याचे समजते.
एकूणच, सोनू कल्याणकर हत्येतील दुसरा आरोपी गोळी झाडून पकडण्यात पोलिसांना यश आले असले, तरी या कारवाईपेक्षा उप निरीक्षकाने गोळी कोणी झाडली आणि का झाडली? हा प्रश्नच सध्या अधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे.घटनेने गुन्हेगारांपेक्षा पोलिसांच्या अंतर्गत कार्यपद्धतीवरच व्यंगात्मक प्रकाश टाकला आहे, एवढे मात्र नक्की!
संबंधित बातमी ….
…. अखेर सोनू कल्याणकरचा खून ; रोहित लोट भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात

One thought on “एलसीबीचे पोलीस निरीक्षक हजर… तरी गोळी पोलीस उपनिरीक्षकाची का ? ”