नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात गुंडगिरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रामाणिकपणे आणि ईमान इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच भरचौकात धमकावण्याचे धक्कादायक प्रकार नित्यनियमाचे झाले आहेत. नुकत्याच घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ग्रामीण ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करणाऱ्या इतवारा वाहतूक पोलिसांना एका हप्तेखोराने भरचौकात गाठून थेट धमकी दिली आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले. भरचौकात पोलिसांचा अपमान आणि धमकीचा प्रकार इतवारा वाहतूक विभागाच्या पथकातील पोलीस कर्मचारी सोमदत्त फुलगोळ आणि मारोती मुंडे हे देगलूर नाका चौरस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ग्रामीण ऑटो रिक्षांवर कारवाई करत होते. त्यांनी ऑटो रिक्षाचालकाला तात्काळ जागा मोकळी करण्यास सांगितले, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला. यावर त्या ऑटोचालकाने हप्ते वसुली करणाऱ्या सय्यद इलियास याला फोन करून बोलावून घेतले. घटनास्थळी तावातावाने पोहोचलेल्या सय्यद इलियास याने वाहतूक पोलिसांना गाठून, तुम्ही नवीन आहात का, मी कोण आहे हे तुम्हाला माहित नाही का, ग्रामीण ऑटोवर कारवाई का करता, असा दम भरत भरचौकात पोलिसांना खडेबोल सुनावले व त्यांचा अपमान केला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण प्रकार तेथून जात असलेले नांदेड चौफेरचे संपादक डॉ. मोहम्मद आरीफखान पठाण यांच्या निदर्शनास आला आणि अनेक उपस्थितांनी या घटनेचे फोटोही काढले. दररोज १०० हून अधिक ग्रामीण ऑटो आणि हप्ते वसुलीचे रॅकेट मिळालेल्या माहितीनुसार, दररोज १०० पेक्षा जास्त ग्रामीण ऑटो रिक्षा अर्धापूर येथून थेट नांदेड शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करतात. या ऑटोचालकांकडून सय्यद इलियास हा दररोज राजरोसपणे हप्ते वसूल करतो. या गोळा केलेल्या रकमेतील काही हिस्सा वजिराबाद पोलिसांकडे जमा होतो, तर उर्वरित रक्कम धमकी देणारा इसम स्वतः हडप करतो, असा खळबळजनक खुलासा एका ग्रामीण ऑटो चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.इतवारा वाहतूक पोलिसांच्या हद्दीतील बरकत कॉम्प्लेक्स आणि देगलूर नाका हे २४ तास वर्दळीचे परिसर असून तेथे हे ग्रामीण ऑटो तासन् तास उभे राहून प्रवाशांची वाहतूक करतात, ज्यामुळे सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. शहरभरातील वाहतुकीची भयावह परिस्थिती केवळ देगलूर नाकाच नव्हे, तर हिंगोली गेट, डॉक्टर लाईन, वजिराबाद भाजीमंडी, श्रीनगर, वर्कशॉप, आनंद नगर आणि भाग्य नगर या भागातही वाहतूक कोंडीची गंभीर समस्या बनली आहे. हिंगोली गेट परिसरात फुल व्यापारी, ट्रॅव्हल्सचे अड्डे आणि टू-व्हीलर व थ्री-व्हीलर मेकॅनिक थेट रस्त्यावरच बस्तान मांडून बसल्यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. अनेक नागरिक व संघटनांनी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, वरकमाई बंद होण्याच्या भीतीपोटी वजिराबाद वाहतूक पोलीस ग्रामीण ऑटोवर कारवाई न करता केवळ शहरी ऑटो चालकांना लक्ष्य करतात, असा आरोपही केला जात आहे. पोलीस अधीक्षकांकडे लक्ष वेधण्याची मागणी घटनेची संपूर्ण माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि इतवारा वाहतूक पोलीस निरीक्षकांना दिली आहे, परंतु त्या हप्तेखोरावर अद्याप ठोस कारवाई झाली आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच जर भरचौकात हप्तेखोर धमकावू लागले, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? नांदेडकरांची आता पोलीस अधीक्षकांकडून हीच अपेक्षा आहे की, त्यांनी कोणालाही न सांगता साध्या वेशात दुचाकीवरून शहरात फेरफटका मारून वाहतुकीच्या भयावह परिस्थितीची आणि पोलिसांच्या कर्तव्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, जेणेकरून या गुंडगिरीला आणि अवैध हप्तेखोरीला तात्काळ आळा बसेल. Kanthak Suryatal Post Views: 8 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये ऑनलाइन खत विक्रीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद