नांदेड :– साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनाची भूमिका अधोरेखित करणारे २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यंदाच्या संमेलनाची सुरुवात पारंपरिक भाषणांऐवजी क्रांतिकारी रॅप सादरीकरणाने होताच संपूर्ण सभागृहात नवचैतन्य निर्माण झाले.
स्वागताध्यक्ष राहुल एस. एन. प्रधान यांच्या नेतृत्वाखाली संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अतिश ढगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘विद्रोहाचा आधुनिक आवाज’ या संकल्पनेतून रॅपर प्रथम तारु, आर.के. स्वागर उर्फ रोहन कपाळे, विशाल इंगोले, विद्रोही साई पाटील आणि अक्षय पाईकराव यांनी सादर केलेल्या रॅपने उपस्थित तरुणाईत प्रचंड ऊर्जा निर्माण केली. सामाजिक विषमता, अन्याय, युवकांची स्वप्ने आणि परिवर्तनाची हाक या विषयांवर आधारित ओळींनी संमेलनाचे वातावरण दणाणून गेले.
रॅपर प्रथम तारु यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवर भाष्य करत “उग नवं माय नांदेड व्हय” या रॅपद्वारे पूरग्रस्तांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंदीतील “अरे आवाज उठाओ, जनता अब तो जाग जाओ… क्रांती की आग तुम खुद में जलाओ” या क्रांतिकारी रॅपमुळे सभागृह भारावून गेले. त्यांच्या सादरीकरणातून “विद्रोह हा शब्दांतच नव्हे तर कृतीतही असला पाहिजे” असा ठाम संदेश देण्यात आला.
आर.के. स्वागर उर्फ रोहन कपाळे यांनी जोशपूर्ण “जय भीम अँथम” ने कार्यक्रमाची रंगत वाढवली. व्यासपीठावर “जय भीम” च्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर “शान आंबेडकर” या रॅपमधून सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
विद्रोही साहित्य परंपरेचा वारसा पुढे नेत, रॅपर विशाल इंगोले यांनी आधुनिक हिप-हॉप आणि पारंपरिक साहित्य यांचा सुंदर मिलाफ सादर केला. तर साई पाटील यांनी युवकांची बेरोजगारी व देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. अक्षय पाईकराव यांनी समाजपरिवर्तनाची गरज आपल्या शब्दांत मांडत विद्रोही विचार मांडले.
विद्रोही साहित्य संमेलनाची परंपरा समाजातील वंचित, पीडित आणि उपेक्षित घटकांचा आवाज बुलंद करण्याची राहिली असून ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही विचारांची छाप या सादरीकरणांत स्पष्टपणे जाणवली.
या क्रांतिकारी रॅप परफॉर्मन्समुळे संमेलनात नव्या पिढीचा आवाज प्रभावीपणे उमटला. साहित्यप्रेमी आणि तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. पारंपरिक साहित्य आणि आधुनिक अभिव्यक्तीचा संगम घडवत यंदाचे संमेलन नांदेडच्या सांस्कृतिक पटावर संस्मरणीय ठरले.एकूणच, साहित्य आणि संगीताच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची हाक देणारा हा क्षण नांदेडकरांसाठी विशेष ठरला.
