बिलोली (प्रतिनिधी)- परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत सुमारे १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेत सुमारे १५ जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांच्या पथकाने बिलोली येथे छापा टाकला. सावळी रोडवरील प्रताप अंकुशकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छाप्यामध्ये रसूल शेख अहमद शेख (वय ४५, रा. बिलोली), बोझा चंद्रशेखर गौड (वय ५०, रा. मोसरा, जि. निजामाबाद), आकाश विठ्ठल कांबळे (वय ३३, रा. वोधन, जि. निजामाबाद), कामी रेड्डी रमन्ना रेड्डी (वय ३५, रा. सालुपरा, जि. निजामाबाद) आणि शेख नवी मिनुमियाँ (वय ३२, रा. सालुरा, जि. निजामाबाद) यांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या बहुतांश आरोपी हे शेजारील तेलंगणा राज्यातील असून जुगार खेळण्यासाठी येथे आले होते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ६ हजार रुपये रोख रक्कम, एक चारचाकी वाहन, १३ दुचाकी वाहने आणि पाच मोबाईल फोन असा एकूण १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरजकुमार तिडके यांच्या तक्रारीवरून जुगार गुन्हा क्रमांक १२/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा 91 50 100 100 या ‘खबर’ हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 866 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन जन्मतारीख दुरुस्तीसाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला रंगेहात अटक