बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा झालेला अपघात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे. सकाळी ८ वाजून १८ मिनिटांपासून ८ वाजून ४३ मिनिटांपर्यंतचा सुमारे २५ मिनिटांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या पंचवीस मिनिटांत नेमके काय घडले, यामध्येच या अपघाताचे अनेक रहस्य दडलेले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अपघाताला जवळपास ३६ तास पूर्ण होत असतानाही नागरिकांच्या मनात शंका कायम आहेत. सरकार या घटनेबाबत काय सांगते, तसेच संबंधित विमान कंपनीबाबत लोकांचे मत काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
हे विमान व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीचे होते. ही कंपनी एक नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर असून, अशा प्रकारच्या विमानांचे उड्डाण वेळापत्रक आधी निश्चित नसते. प्रामुख्याने व्हीआयपी, उद्योगपती किंवा राजकीय नेते अशा सेवा वापरतात. व्हीएसआर व्हेंचर्सला २०१४ मध्ये परवाना देण्यात आला असून, २०२३ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सध्या हा परवाना २०२९ पर्यंत वैध आहे. ही कंपनी देशातील मोठ्या नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर कंपन्यांपैकी एक मानली जाते.
या कंपनीकडे एकूण १७ विमाने असून, त्यापैकी एका विमानाचा हा अपघात झाला. सर्व विमानांचे लेखापरीक्षण २०२५ मध्ये करण्यात आले होते आणि सरकारच्या माहितीनुसार त्या वेळी कोणताही तांत्रिक दोष आढळलेला नव्हता. या कंपनीचे संचालक दिल्लीचे व्ही.एस. आनंद आहेत. लवचिक पेमेंट पद्धतीमुळेही ही कंपनी अनेकांमध्ये लोकप्रिय होती. महत्त्वाची बाब म्हणजे, २०२३ मध्ये याच विमानाचा मुंबई विमानतळावर उतरताना अपघात झाला होता. त्या अपघाताचा तपास अद्याप सुरू असून अंतिम अहवाल आलेला नाही. जर तो अहवाल वेळेत आला असता आणि काही दोष आढळले असते, तर त्यानुसार आवश्यक सुधारणा करता आल्या असत्या आणि कदाचित हा अपघात टाळता आला असता, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
अपघातग्रस्त विमानाचे उत्पादन २०१० मध्ये झाले होते. त्याला डिसेंबर २०२२ मध्ये नोंदणी क्रमांक देण्यात आला होता. उड्डाणासाठीची परवानगी २०२१ मध्ये मिळाली होती. या विमानाची शेवटची हवाई तपासणी ८५ तास आधी करण्यात आली होती. विमानाचे वैमानिक अत्यंत अनुभवी होते. त्यांना १५ हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. त्यांची शेवटची वैद्यकीय तपासणी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली असून ती १९ मे २०२६ पर्यंत वैध होती.सरकारच्या माहितीनुसार, बारामती विमानतळ हा अनियंत्रित (Uncontrolled) विमानतळ आहे. येथे एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) टॉवर नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की वैमानिक मनमानी करू शकतो. उड्डाण आणि उतरण्याच्या ठरावीक पद्धती त्याला पाळाव्याच लागतात. बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण संस्थेतील पायलट उतरणाऱ्या व उड्डाण करणाऱ्या विमानांना मदत करतात. तसेच पुणे एटीसीशी सतत संपर्क ठेवला जातो.

पुणे एटीसीशी झालेल्या संभाषणानुसार, सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी, विमान ३० नॉटिकल मैल अंतरावर असताना, नियंत्रकाने वैमानिकाला उतरण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळी दृश्यमानता ३००० मीटर असल्याची माहिती देण्यात आली होती आणि धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र धावपट्टी न दिसल्यामुळे वैमानिकाने गो-अराउंड केले. नंतर धावपट्टी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आणि उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे विमान अत्यंत कमी उंचीवर, एका बाजूला कलंडलेले दिसते आणि त्यानंतर अपघात झाल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाचा तपास आता एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करणार असून ही सर्व माहिती केंद्र सरकारने अधिकृतपणे दिली आहे.
दरम्यान, २०२३ मधील अपघाताचा अंतिम अहवाल अद्याप न आल्याने शंका अधिक गडद होत आहेत. शेवटचे संभाषण नेमके काय होते, याबाबत केंद्र सरकारने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. राज्य सरकारचे वैमानिक संजय कर्वे यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, ज्या कंपनीने २०१० मध्ये विमानांचे उत्पादन बंद केले आहे, त्या कंपनीचे सुटे भाग भविष्यात कसे उपलब्ध होतील? ठरावीक कालावधीपर्यंत सुटे भाग दिले जातात, मात्र २०२६ नंतर त्यांचा पुरवठा नसेल, ही बाब गंभीर आहे.या अपघातानंतर आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे, एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये व्हीआयपी विमानांना दिली जाणारी सूट. अनेक वेळा व्हीआयपींचे दौरे अचानक ठरतात आणि त्यासाठी तातडीने उड्डाण किंवा उतरणे करावे लागते. मात्र यासाठी डीजीसीएकडे स्वतंत्र व स्पष्ट नियमावली का नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. शरद पवार यांनी सांगितले की, या अपघातात एक कर्तृत्ववान नेता हरपला आहे. काही माध्यमांत राजकारणाचा रंग दिला जात असला तरी त्यांनी कोणत्याही कटाच्या आरोपांना थेट पाठिंबा दिलेला नाही. तर शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात असून, महाराष्ट्राचे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे असल्याचे म्हटले आहे.या प्रकरणात कोणताही कट किंवा षडयंत्र नसावे, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. मात्र या अपघाताच्या निमित्ताने खाजगी आणि व्हीआयपी विमानांसाठी, विशेषतः उड्डाण व उतरण्याच्या संदर्भात, एअर ट्रॅफिक कंट्रोलची अधिक कणखर आणि स्पष्ट नियमावली तयार व्हावी, अशी अपेक्षा नक्कीच व्यक्त करता येईल. वाय.एस.आर. रेड्डी यांच्या हेलिकॉप्टर अपघातानंतर हेलिकॉप्टर उड्डाणासाठी जशी कडक नियमावली लागू करण्यात आली, तशीच व्यवस्था भविष्यात व्हीआयपी खाजगी विमान वाहतुकीसाठीही करण्यात यावी, हीच या घटनेतून मिळणारी महत्त्वाची शिकवण ठरेल.
