नांदेड(प्रतिनिधी)-14 सप्टेंबर रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार बालाजी सातपुते यांना मारहाण झाल्याची माहिती दुपारी 3 वाजता प्राप्त झाली. दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी हा घटनाक्रम पोलीस विभाग, पोलीसींग करतांना आणि अवैध वाळू संदर्भाचा नसल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी संध्याकाळी यात मोठा गौप्यस्फोट झाला. दोन अल्पवयीन बालक एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. आज 17 सप्टेंबर रोजी वृत्तलिहिपर्यंत तरी जखमी बालकांचा जबाब नोंदविण्यात आला नव्हता. खाजगी दवाखान्याने या संदर्भाचे एमएलसी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण यांच्याकडे पाठविली आहे. पण म्हणतात ना पोलीस खाते करील ते होईल. जखमी व्यक्ती जबाब देण्याच्या परिस्थितीत नाही असे अहवाल दररोज बनवता येवू शकतात.
आज खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाची भेट घेतली. तो सांगत होता, की मला पोलीस बालाजी सातपुते, त्यांचे दोन बंधू, मुलगा आणि इतर एक नातलग अशा लोकांनी मिळून मारहाण केली आहे. माझे तीन दात तुटले आहेत. माझ्या पाठीवर जखमा एवढ्या आहेत की, त्यावर 42 टाके लावावे लागले आहेत. रुग्णांची परिस्थिती कधी-कधी जबाब देण्यासारखी नसते. हे सुध्दा नाकारता येणार नाही. परंतू जबाब घ्यायचा नाही म्हणून असा अभिलेख बनविला जात असेल तर मात्र हे चुकीचे आहे. कारण बालाजी सातपुते आणि त्यांचे बंधू केशव सातपुते हे दवाखान्यात उपचार घेत असतांनाच त्यांच्या तिसऱ्या बंधूने तक्रार दिलेली आहे आणि त्यावरून मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न, जिवघेणा हल्ला या सदरांखाली गुन्हा दाखल झाला आहे.
पण एमएलसी आल्यानंतर आज तिसरा दिवस आहे. तरी पण जखमीचा जबाब घेतल्या जात नाही. याचे काय कारण असेल. याचा शोध घेतला असता कोठून तरी दबाव असेल? पण तो कोणाचा ? या प्रकरणात आक्षेप मात्र आला तर त्याची जबाबदारी मात्र नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांचीच असणार आहे. कारण त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि पोलीस ठाण्यातील कारभार सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
संबंधीत बातमी….
पोलीस अंमलदार बालाजी सातपुते जिवघेणा हल्लाप्रकरणातील सत्य जखमी बालकांच्या जबावरून बाहेर येईल
