नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी आणि सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाची शिफारस न झाल्याने तीव्र खंत व्यक्त केली आहे. राज्यात सामाजिक न्यायाची भाषा केली जात असताना, तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याबाबत अद्याप गांभीर्याने विचार होत नसल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. डॉ. सान्वी जेठवाणी या सध्या महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्ष, सदस्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष तसेच इंटरनॅशनल किन्नर अखाड्याच्या PRO या पदांवर कार्यरत आहेत. याशिवाय त्या लावणी नृत्यांगना, मॉडेल म्हणूनही प्रसिद्ध असून तृतीयपंथी समाजातून ‘मिस प्लस साईज इंडिया’ हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत.सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेतानाच, खा. अशोकराव चव्हाण आणि खा. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी नांदेडमधील निवडणुकीच्या काळात पक्षासाठी प्रचंड परिश्रम घेतले होते. मात्र, आपल्या या प्रामाणिक कामाची दखल न घेतल्याने त्या नाराज आहेत. डॉ. जेठवाणी या यापूर्वी भारत निवडणूक आयोगाच्या राज्य आयकॉन राहिल्या असून त्यांनी मतदार जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवले आहेत. शासनाच्या तृतीयपंथी धोरण २०२४ च्या निर्मितीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्याच प्रयत्नांतून राज्यातील पहिला तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनू’ आयोजित करण्यात आला होता. तसेच २०१७ पासून त्यांच्या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तृतीयपंथी समाजासाठी रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि सन्मानाने जगण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. सध्या त्या चार तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही सांभाळत आहेत. या पार्श्वभूमीवर, डॉ. जेठवाणी यांनी पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही तृतीयपंथी समाजाला राज्यसभा किंवा विधानपरिषदेसारख्या मंचांवर प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “आज देश-विदेशात तृतीयपंथी समाजाला संधी दिली जात आहे; महाराष्ट्रात मात्र राजकारणात न्याय मिळण्याची प्रतीक्षा कधी संपेल?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भविष्यात पक्ष नेतृत्व तृतीयपंथी समाजाच्या सक्षम व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत स्थान देईल, असा विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. Kanthak Suryatal Post Views: 967 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तांदूळ खरेदीच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक नांदेड जिल्ह्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट