नांदेड(प्रतिनिधी)-24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी शिवारातील गोदावरी पात्रातून नांदेड ग्र्रामीण पोलीसांनी अवैध रेती, सहा इंजन आणि 17 तराफे असा 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यातील काही मुद्देमाल आग लावून जागीच नष्ट करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार प्रमोद गोविंदराव कऱ्हाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना मिळालेल्या माहितीनुसार 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास त्यांच्यासोबत पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, शेट्टे, तेलंग, श्रीमलवार, कदम, भिसे, पटेल, कौठेकर, मेकलवाड, शेख रियाज आणि इमरान असे विष्णुपूरी शिवारात पोचले. तेथे वाळू माफीया, इंजिन व तराफ्याच्या सहाय्याने वाळू काढत होते. पोलीसांना पाहुन 5 ते 6 जण नदीमध्ये उड्डी मारुन पलिकडच्या किनाऱ्यावर पोहून पळून गेले. दोन आरोपींना पोलीसांनी त्यांच्या मागे नदीत उड्ड्या मारुन पोहुन त्यांना पकडून आणले. त्या ठिकाणी साठवून ठेवलेली 25 ब्रास रेती 1 लाख 25 हजार रुपये किंमतीची, 6 इंजिन 12 लाख रुपयांचे, रेती काठावर आणणारे 17 तराफे 8 लाख 50 हजार रुपयांचे असा एकूण 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काही मुद्देमाल तेथेच आग लावून नष्ट करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे या प्रकरणात चार कायद्यांचा उल्लेख करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 303(2)(3)(5). महाराष्ट्र जमीनी महसुल संहिता 1966 च्या कलम 48(7), 48(8) या पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 9 आणि 15 तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 मधील कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा क्रमांक 707/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अभिलेखामध्ये पांडूरंग महादेव हंबर्डे (55) रा.काळेश्र्वरनगर विष्णुपूरी आणि आच्छेलाल गुलाबचंद राम (32) रा.लक्ष्मणपुरा जि.बलिया(उत्तरप्रदेश) यांच्यासह इतर सहा आरोपींचे नावे आहेत.
गोदावरी पात्रातून रेती काढतांना छापा; पोलीसांनी नदीत उड्या मारून आरोपी पकडले
