नांदेड(प्रतिनिधी)-हरीओम विठ्ठलाच्या गजराने नांदेडनगरी दुमदुमली. शहरातील सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. अत्यंत शांततेत आणि उत्साहात आषाढी एकादशी हा सण साजरा झाला. दुपारी जुना मोंढा येथून माऊली वारी निघाली. त्यात महिला, पुरूष, बालक असे सर्वच सहभागी झाले होते आणि विठू नामाच्या गजरात फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला. अनेक जागी किर्तनकारांनी विठ्ठलाची महिमा सांगितली.
आज आषाढ शुध्द एकादशी अर्थात पंढरपुरच्या विठ्ठलाच्या सन्मानार्थ हा दिवस भारतातच नव्हे तर जगभर साजरा केला जातो. पंढरपूरला तर विठ्ठलभक्तांचा एवढा मोठा जमाव आहे की, त्याला शब्दात उल्लेखीत करणे अवघड आहे. आज नांदेड शहरात सुध्दा रुप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी या शब्दांप्रमाणे प्रत्येक जण विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेला होता. विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शन, आरती आणि प्रसाद आयोजित करण्यात आला होता. महिला, पुरूष, बालक, बालिका या सर्वांनाच विठ्ठलाची ओढ किती आहे हे आज मंदिरांमधील गर्दी पाहिल्यानंतर लक्षात आले.
आज दुपारी माऊली दिंडी काढण्यात आली. ही माऊली दिंडी जुना मोंढा भागातून सुरू करण्यात आली. ही दिंडी श्री.स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे समाप्त झाली. दिंडीमध्ये विठ्ठल आणि रुख्मीणीचे रुप घेवून युवक-युवती अत्यंत प्रभावी दिसत होते. दींडीतील महिला विठ्ठलाचा गजर करत आनंद व्यक्त करत होत्या. एकंदरीतच नांदेड शहर सुध्दा विठ्ठल नामाने दुमदुमले होते.
हरीओम विठ्ठलाच्या गजराने नांदेडनगरी दुमदुमली
