मध्य प्रदेशातील बैतूल येथील हेमंत विजय खंडेलवाल यांची भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) मध्य प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते संघनिष्ठ असून, मुख्यमंत्री मोहन यादव यांना प्रशासन चालवताना त्रास होऊ नये, यासाठी ही नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे.
हेमंत खंडेलवाल यांची नियुक्ती होईल, अशी अटकळ होती; मात्र हेमंत खंडेलवाल यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर आपले स्थान पक्के केले. त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी जे विचार मांडले, ते यापूर्वी कोणत्याही अध्यक्षाने स्पष्टपणे व्यक्त केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
हेमंत खंडेलवाल हे दिवंगत खासदार विजय खंडेलवाल यांचे पुत्र असून, त्यांनी राजकारणाचा वारसा आपल्या वडिलांकडूनच घेतला आहे. विजय खंडेलवाल 1980 मध्ये भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यापासून पक्षाशी सक्रियपणे जोडले गेले होते आणि लोकसभेचे सदस्य होते. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत खंडेलवाल विजयी झाले आणि त्यानंतर त्यांनी आपले राजकीय करिअर सुरू केले.ते केवळ राजकीयच नव्हे तर एक यशस्वी उद्योजकही आहेत. साची दूध उत्पादन आणि अमूलसारख्या सहकारी संस्थांमध्येही त्यांचे योगदान मान्य केले जाते. बैतुल आणि आसपासच्या भागात ते नगरसेठ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
61 वर्षीय हेमंत खंडेलवाल यांच्या निवडीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पसंतीऐवजी संघाच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे, अशीही चर्चा आहे.मध्य प्रदेश भाजपाध्यक्ष पदासाठी धर्मेंद्र प्रधान हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांनी हेमंत खंडेलवाल यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. निवडीनंतर खंडेलवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “जो पक्षाच्या धोरणांप्रमाणे चालेल त्याची प्रशंसा होईल, आणि जो त्याविरुद्ध जाईल त्याला त्रास सहन करावा लागेल.” त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे.
भाजपच्या इतिहासात सुंदरलाल पटवा, शिवराजसिंह चौहान यांच्यासारखे अनेक मातब्बर नेते अध्यक्षपद भूषवून गेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर हेमंत खंडेलवाल यांची नियुक्ती विशेष मानली जात आहे.काल झालेल्या पदग्रहण समारंभात अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यांच्या बोलण्यातून नेतृत्वाची झलक दिसून आली. मुख्यमंत्री मोहन यादव आणि हेमंत खंडेलवाल हे दोघेही सुरेश सोनी यांचे शिष्य असून, संघात सुरेश सोनी यांच्या शब्दाला महत्त्व असल्याचे सर्वज्ञात आहे.
हेमंत खंडेलवाल यांची कार्यशैली, टीम आणि त्यांचे भविष्यातील निर्णय काय दिशा घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अजून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून त्यांना मिळणारे पाठबळ हेही त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभाव टाकणार आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने हेमंत खंडेलवाल यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!