२० वे समरसता साहित्य संमेलन २ व ३ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणार ;स्वागताध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे यांची पत्रकार परिषदेत माहिती 

 

नांदेड : समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने २० वे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. हे संमेलन श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्यनगरी, भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, नांदेड येथे होणार असून, याची माहिती स्वागताध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. नामदेव कांबळे हे ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व ‘राघववेळ’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आहेत.

संमेलनाचे उद्घाटन वंदनीय भदंत डॉ. राहूल बोधी महाथेरो (अध्यक्ष, ऑल इंडिया भिक्खू महासंघ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. किशोर मकवाणा (अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, भारत सरकार) हे उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाच्या संयोजनासाठी विविध पदाधिकाऱ्यांचे योगदान असून, कार्यवाह माणिक भोसले, निमंत्रक शिवा कांबळे, सहनिमंत्रक डॉ. माया गायकवाड, प्रा. डॉ. धनंजय भिसे, डॉ. राजेश कापसे, महाव्यवस्थापक अभय कोटलवार, सहव्यवस्थापक राजेश मांजरमकर हे परिश्रमपूर्वक नियोजन करत आहेत. संमेलन यशस्वी व्हावे यासाठी विविध समित्याही गठित करण्यात आल्या आहेत.

या संमेलनात शहरातून भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन होणार असून, उद्घाटक व अध्यक्ष यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, विविध परिसंवाद, साहित्यिक संवाद, मुलाखती, विद्यार्थी वक्त्यांचे ग्रंथपरिचय सत्र, कविसंमेलन, खुला काव्यमंच, गझल मंच तसेच रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम यांचा मनोहारी संगम अनुभवता येणार आहे. संमेलनस्थळी भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री केंद्र देखील उभारण्यात येणार आहे.

सुमारे ६०० हून अधिक साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत व साहित्यरसिक महाराष्ट्रभरातून या संमेलनात सहभागी होणार आहेत. समरसता साहित्य परिषदेने गेल्या अनेक वर्षांत समतावादी, मूल्याधिष्ठित व सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणाऱ्या विचारप्रधान साहित्य परंपरेची जपणूक केली आहे. हीच परंपरा पुढे नेणाऱ्या या २० व्या संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संपूर्ण नांदेड शहर आणि साहित्यप्रेमी सज्ज झाले आहेत. नांदेडकरांसाठी ही एक संस्मरणीय साहित्यिक व सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे अशी माहितीही संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा डॉ. अजित गोपछडे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!