गंगाखेड पोलीसांनी हरवलेले 3 लाख रुपये काही मिनिटांमध्ये शोधून मालकांना परत केले

नांदेड(प्रतिनिधी)-गंगाखेड येथे राहणारे पती-पत्नी 3 लाख रुपये रोख रक्कम घेवून जात असतांना त्यांच्या हातातील गुलाबी रंगाची थैली गहाळ झाली. गंगाखेड येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश शिंदे आणि त्यांच्या टिमने हे पैसे अत्यंत कमी वेळात त्या पती-पत्नीला परत केले. याबद्दल आमच्या काबाड कष्टाचे पैसे अत्यंत कमी वेळात मिळवून दिले याबद्दल देशखमुख पती-पत्नीने गंगाखेड पोलीसांना धन्यवाद दिले आहे.
29 मार्च रोजी दुपारी 3.45 वाजता लेक्चरर कॉलनी गंगाखेड येथे राहणारे प्रभाकर बाळासाहेब देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ.शारदा देशमुख हे सुंदरलाल सावजी बॅंक येथून 3 लाख रुपये रोख रक्कम घेवून दुचाकीवर बसून भाजीमार्केट-आहिल्यादेवी होळकर चौक -डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-रेल्वे गेट-तहसील कार्यालय-लेक्चरर कॉलनी असे आपल्या घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपली रोख रक्कमेची बॅग गहाळ झाली आहे.
देशमुख पती-पत्नी गंगाखेड पोलीस ठाण्यात परत आले. तेथे त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक इंगळे यांची भेट घेतली. इंगळे यांनी घडलेला प्रकार पोलीस ठाणे प्रभारी पदावर कार्यरत सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश शिंदे, पोलीस उपअधिक्षक डॉ.दिलीप टिपरसे यांना सांगितला. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख शेख असद, पोलीस अंमलदार शंकर कामावार, परशुराम परचेवाड, सावंत यांनी देशमुख पती-पत्नी ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने त्यांच्य पैशांचा शोध सुरू केला. सोबतच वेगवेगळ्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही सुध्दा तपासले आणि पोलीसांच्या मेहनतीला यश आले आणि हा शोध घेत असतांना देशमुख पती-पत्नींची हरवलेली गुलाबी रंगाची पिशवी सापडली. त्यातील पैसे जशास तसे होते.
देशमुख पती-पत्नीने आपल्या पैशांचा बॅगला पाहिल्यानंतर त्यांचा उर भरून आला होता. आपल्या शब्दात पोलीसांनी आपल्या काबार कष्टाचे पैसे अत्यंत कमी वेळात आम्हाला परत मिळवून दिले हे सांगतांना त्यांच्या मनातील भावना कळत होत्या. परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी गंगाखेड पोलीस पथकाचे उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!