Oplus_131072

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अवैध धंद्यांचे केंद्र गणेशनगर वाय पॉईंट आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही. काही दिवसांपुर्वीच त्या ठिकाणी एका युवकाचा खुन झाला होता. या ठिकाणी एक दारु अड्डा आहे तो कायदेशीर चालतो काय? त्या ठिकाणी अवैध पणे गॅस भरण्याचा धंदा नव्याने सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोबतच सावकारी कायद्याचा परवाना घेवून त्यात किती अवैध कारभार चालतात हा सुध्दा एक विषय मोठा आहे.
नांदेड शहरात अवैध धंद्यांचे केंद्र असा उल्लेख करायचा असेल तर तो उल्लेख गणेशनगर भागातील वाय पॉईंटला करावा लागेल. या ठिकाणी एक दारु अड्डयाची महती सुध्दा भरपूर मोठी आहे. आपल्या नावाचा अड्डा दुसऱ्याला देवून हा अड्डा चालविला जातो. दारु विक्रीसाठी सुध्दा अनेक नियमावली आहेत. त्या नियमावलीनुसारच हा अड्डा चालतो काय हा ही प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळच्या सुर्योदय होण्याअगोदरच या दारु अड्‌ड्यातून जिल्ह्यात विविध ठिकाणी दारु पाठविली जाते असेही या भागातील नागरीक सांगतात. त्यावर कोणीच वचक आणला नाही. म्हणूनच हा सर्व व्यवहार चालत असतो.
याच ठिकाणी अवैध पणे वाहनात गॅस भरण्याचा धंदा सुरू झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. घरगुती गॅस वाहनांमध्ये भरून तो एक मोठा पैस कमविण्याचा मार्ग वायपॉईंवरच सुरू झाला आहे. सर्वांनाच कमी मेहनतीत जास्त पैसे हवे असतात. पण हे पैसे कमवतांना त्याचा समाजावर काय परिणाम होत असतो हे सुध्दा पाहण्याची गरज आहे. पैसे खुप आले म्हणजे माणुस सुखी होत नसतो. सिंघानीयाला त्याच्या दोन लेकरांनी करोडो, अब्जो रुपयांची संपत्ती आपल्या नावावर झाल्याबरोबर घराबाहेर काढल्याची घटना नवीनच आहे. अजुन त्यावरची चर्चा संपलेली नाही.
या ठिकाणी एका व्यक्तीकडे सावकारी कायद्याचे लायन्सस सुध्दा आहे असे सांगण्यात आले. परंतू सावकारी कायद्यात ज्या नियमावली प्रमाणे पैसे देणे, त्यावरील व्याज वसुल करणे या संदर्भाने या सावकारी व्यवसायात नियमितता आले काय याची तपासणी कोण करेल. ज्या ठिकाणी दारु विक्री होते, ज्या ठिकाणी दारु पिण्याची सोय असते. त्याच ठिकाणावरून वेगवेगळ्या अवैध धंद्यांची सुरुवात होत असते. हे सर्व व्यवसाय पोलीस माझ्या जवळचे आहेत याच दमावर चालविले जातात असेही या भागातील नागरीक सांगत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

आई दुर्गेचा जयघोष की डीजेच्या तालावर प्रेमगीतांचा जल्लोष? विसर्जन मिरवणुकीतील काही प्रकारांवर प्रश्नचिन्ह!देखावे उत्कृष्ट, भक्तीचा उत्साहही वाखाणण्याजोगा; मात्र उधळलेले रंगीत कागद, हळदीची धूळ आणि प्रेमगीतांवरील नृत्याने उत्सवाच्या पावित्र्यालाच धरले धारेवर!नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल आई दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. दहा दिवस मनोभावे पूजा-अर्चना, आरती आणि भक्तिभावाने आई दुर्गेची सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी ‘जय अंबे’, ‘जय माता दी’च्या जयघोषात देवीला निरोप देण्यात आला. अनेक दुर्गा मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे, सजावट, भक्तिमय वातावरण आणि मिरवणुकीतील उत्साह निश्चितच कौतुकास पात्र ठरला. काही मंडळांनी आपल्या कल्पकतेचा उत्तम परिचय देत विसर्जन सोहळ्याला वेगळीच शोभा आणली.मात्र, या संपूर्ण उत्सवात जिथे भक्तीची उंची दिसायला हवी होती, तिथे काही ठिकाणी डीजेच्या आवाजाने, प्रेम गीतांच्या तालावर झालेल्या नृत्याने आणि रंगीत कागदांच्या उधळपट्टीने वेगळाच तमाशा उभा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो,आई दुर्गेला निरोप देण्यासाठी निघालो होतो की डीजेच्या तालावर स्वतःचे प्रदर्शन करण्यासाठी?डीजेवर भक्तिगीतांचा सूर हरवला; प्रेमगीतांचा जल्लोष मात्र जोरात!देवीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे, लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि भक्तिगीतांचा गजर असणे स्वाभाविक आहे. अशा वातावरणातून भक्ती, संस्कृती आणि सामूहिक उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. मात्र, काही ठिकाणी डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांचा आणि त्यावर सादर होणाऱ्या नृत्याचा देवीच्या विसर्जनाशी नेमका संबंध काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.‘काला कव्वा काट खायेगा’, ‘सच बोल, सैराट, छोरा बनारस वाला’, ‘कधी होणार तू माझ्या लेकराची’, तसेच प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या इतर गाण्यांच्या तालावर काही जण नृत्य करताना दिसले. आई दुर्गेची प्रतिमा विसर्जनासाठी घेऊन जात असताना अशा गाण्यांची निवड कितपत योग्य आहे, याचा विचार संबंधित मंडळांनी करायला नको का?या मिरवणुकीत झेन जी,जेन अल्फा आणि झेन बीटा सहभागी झालेले होते. आपणच आपल्या पुढील पिढीना काय देत आहोत हा प्रश्न मिरवणुकीत असे गाणे आणि नृत्य पाहून वाटत होते. आईच्या निरोपाला भक्तीचा भाव हवा की प्रेमगीतांच्या तालावर नृत्याचा आविष्कार? हा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे कोणाच्या आनंदावर विरजण घालणे नव्हे; तर उत्सवाच्या मूळ उद्देशाची आठवण करून देणे होय. गाण्यांची निवड आणि नृत्याची पद्धत याबाबत प्रत्येक मंडळाने स्वतःहून काही मर्यादा ठरवणे गरजेचे आहे. कारण उत्सवातील उत्साह आणि सार्वजनिक कार्यक्रमातील जबाबदारी या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. भक्तीच्या नावाखाली कोणतेही प्रदर्शन योग्य ठरत नाही.रंगीत कागदांची उधळण : आनंद मंडळाचा, स्वच्छतेचा त्रास नागरिकांचा!विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी छोट्या तोफा किंवा तत्सम साधनांतून रंगीत कागद हवेत उडवण्याचा प्रकार केला. वरवर पाहता हा प्रकार आकर्षक वाटतो. हवेत उडणारे रंगीत कागद, गुलाल आणि फटाक्यांचा गजर पाहून काहींना आनंदही होत असेल. मात्र, या काही क्षणांच्या आनंदानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांचे काय? मिरवणुकीच्या मार्गावर घरे असलेल्या नागरिकांना, विशेषतः महिलांना, या रंगीत कागदांचा आणि उधळलेल्या साहित्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. घराच्या अंगणात, खिडक्यांत, छतावर आणि परिसरात साचलेले कागद गोळा करण्याची जबाबदारी शेवटी कोणाची? उत्सव साजरा करणारे मंडळ पुढे निघून जाते; पण मागे उरलेला कचरा साफ करण्याची वेळ स्थानिक रहिवाशांवर येते.मिरवणुकीतील पाच मिनिटांचा आनंद आणि नागरिकांच्या घरातील तासन्तास चालणारी स्वच्छता यातील समतोल कोण साधणार?उत्सव साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; पण सार्वजनिक रस्ते आणि इतरांच्या घरांचा परिसर अस्वच्छ करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रंगीत कागद उडवण्याचा प्रकार आकर्षक वाटत असला, तरी त्यातून निर्माण होणारा कचरा आणि पर्यावरणावरील परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा कागदांमुळे नाल्या अडण्याची, परिसर अस्वच्छ होण्याची आणि स्वच्छतेचा खर्च वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकारावर आता केवळ दुर्लक्ष करून चालणार नाही.हळदीचा रंग हवेत, नागरिकांच्या नाकात; आनंदाच्या उधळपट्टीची किंमत कोण मोजणार?काही मिरवणुकांमध्ये गुलाल, हळद आणि इतर रंगीत पदार्थांची मोठ्या प्रमाणावर उधळण झाल्याचे चित्रही समोर आले. मिरवणूक संपल्यानंतरही त्याचे परिणाम लगेच संपत नाहीत. रस्त्यावर उडालेली हळद, हवेत तरंगणारी धूळ आणि परिसरात साचलेले रंगीत पदार्थ यांचा त्रास दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही सहन करावा लागू शकतो. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या नाकातोंडात हळद आणि धुळीचे कण जाणे, कपडे खराब होणे आणि परिसराची स्वच्छता करण्याची वेळ येणे, ही उत्सवाची अपेक्षित फलश्रुती नक्कीच नाही. एका बाजूला पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जाते आणि दुसऱ्या बाजूला हवेत मोठ्या प्रमाणात रंगीत पदार्थ उधळले जातात. मग पर्यावरणपूरकतेचे भाषण केवळ व्यासपीठापुरतेच मर्यादित ठेवायचे का? हळद किंवा गुलाल वापरण्याचा प्रत्येक प्रकार धोकादायकच असतो, असे नाही. मात्र, त्याचे प्रमाण, त्यातील घटक, उडणारी धूळ आणि स्वच्छतेची जबाबदारी यांचा विचार न करता केलेली उधळपट्टी निश्चितच चिंताजनक आहे.आवाजाच्या दणक्यात भक्तीचा आवाज हरवू नये!डीजेचा कर्णकर्कश आवाज, फटाक्यांचा गोंगाट आणि त्यातून निर्माण होणारा त्रास हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना मोठ्या आवाजाचा उत्साह जाणवत असेल; मात्र त्याच मार्गावर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे, लहान मुलांचे, रुग्णांचे आणि इतर नागरिकांचे काय? उत्सव म्हणजे केवळ सहभागी मंडळींचा आनंद नसतो. सार्वजनिक उत्सवात सहभागी नसलेल्या नागरिकांनाही सुरक्षितता, शांतता आणि स्वच्छ परिसर मिळण्याचा तितकाच अधिकार आहे. ध्वनिक्षेपकांच्या आवाजाच्या मर्यादा, लागू असलेल्या वेळेच्या अटी आणि फटाक्यांसंबंधीचे नियम पाळणे ही मंडळांची जबाबदारी आहे. ‘उत्सव वर्षातून एकदाच येतो’ हा युक्तिवाद नियम मोडण्याचा परवाना ठरू शकत नाही.गणेश मंडळे असोत वा दुर्गा मंडळे—आता आत्मपरीक्षणाची वेळ!हा प्रश्न केवळ कालच्या दुर्गा विसर्जनापुरता मर्यादित नाही. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव किंवा इतर कोणताही सार्वजनिक उत्सव असो, प्रत्येक मंडळाने आपल्या कार्यपद्धतीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. देखावे उत्कृष्ट असावेत, सजावट आकर्षक असावी, मिरवणूक शिस्तबद्ध असावी आणि भक्तिभावही ओसंडून वाहावा याला कोणाचाही विरोध नाही. उलट, चांगल्या कामाचे कौतुक झालेच पाहिजे. मात्र, उत्कृष्टतेची स्पर्धा केवळ मोठ्या डीजेवर, महागड्या सजावटीवर, कागदांच्या उधळपट्टीवर किंवा कोण अधिक मोठा आवाज करतो यावर आधारित असू नये.मंडळाचा मोठेपणा आवाजाच्या डेसिबलमध्ये मोजायचा की समाजासाठी केलेल्या कामात?हा प्रश्न प्रत्येक पदाधिकाऱ्याने स्वतःला विचारावा. कारण मंडळाची खरी प्रतिष्ठा ही केवळ मिरवणुकीतील गर्दीतून नव्हे, तर समाजाप्रती असलेल्या जबाबदारीतून निर्माण होते.पुढील उत्सवांसाठी स्वतंत्र आचारसंहिता हवी!यापुढील प्रत्येक सार्वजनिक उत्सवापूर्वी मंडळांनी एक सामूहिक आचारसंहिता तयार करावी. त्यामध्ये पुढील बाबींना प्राधान्य देता येईल.गाण्यांची योग्य निवड: देवीच्या विसर्जन मिरवणुकीत भक्तिमय, सांस्कृतिक आणि प्रसंगाला अनुरूप संगीताला प्राधान्य द्यावे.नृत्य सादरीकरणाला मर्यादा: धार्मिक मिरवणुकीचे स्वरूप आणि सार्वजनिक शिष्टाचार यांचा विचार करून नृत्याचे नियोजन करावे.कागदांची उधळण टाळावी: पर्यावरणाला हानी पोहोचवणारे किंवा मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणारे साहित्य वापरणे टाळावे.गुलाल आणि हळदीचा मर्यादित वापर: हवेत मोठ्या प्रमाणावर धूळ उडेल अशी उधळण टाळून नागरिकांच्या आरोग्याचा विचार करावा.ध्वनी आणि फटाक्यांवर नियंत्रण: लागू असलेल्या नियमांचे पालन करून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास कमी करावा.स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी: मिरवणूक संपल्यानंतर संबंधित मार्ग आणि परिसर स्वच्छ करण्याची व्यवस्था मंडळांनी करावी.नागरिकांच्या तक्रारींसाठी व्यवस्था: मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक यांच्याशी संपर्क साधता येईल अशी व्यवस्था असावी.अशा आचारसंहितेमुळे उत्सवाचा आनंद कमी होणार नाही; उलट त्याला अधिक सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख स्वरूप प्राप्त होईल.पोलिसांचे नियोजन कौतुकास्पद; आता मंडळांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची!जिल्ह्यातील विसर्जन मिरवणुका व्यवस्थित पार पडाव्यात, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनाचे आणि परिश्रमांचे कौतुक करणे आवश्यक आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने कितीही मेहनत घेतली, तरी प्रत्येक मंडळाने स्वतःची जबाबदारी ओळखल्याशिवाय सार्वजनिक उत्सव पूर्णपणे शिस्तबद्ध होऊ शकत नाहीत. प्रत्येक गोष्टीवर पोलिसांनीच लक्ष ठेवावे, प्रत्येक चुकीसाठी पोलिसांनीच हस्तक्षेप करावा आणि प्रत्येक वेळी प्रशासनानेच शिस्त लावावी, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. स्वयंशिस्त हीच सार्वजनिक उत्सवांची खरी ताकद आहे.शेवटी एकच प्रश्न : आईला निरोप देताना आपण तिच्या शिकवणीचा निरोप तर देत नाही ना?आई दुर्गेची दहा दिवस मनोभावे पूजा करायची, तिच्या चरणी नतमस्तक व्हायचे, शक्ती आणि सद्बुद्धीचे आशीर्वाद मागायचे आणि अकराव्या दिवशी तिच्या विसर्जन मिरवणुकीतच सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण आणि सामाजिक भान विसरायचे या विरोधाभासाचा विचार होणे गरजेचे आहे. आई दुर्गा ही शक्ती, संयम, सद्बुद्धी आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे प्रतीक मानली जाते. मग तिच्या नावाने साजरा होणाऱ्या उत्सवात नागरिकांना त्रास होईल असे प्रकार घडत असतील, तर आपण नेमकी कोणती शिकवण पुढे नेत आहोत? मिरवणुकीत जयघोष असावा, पण तो इतरांचा आवाज दाबणारा नसावा. रंगांची उधळण असावी, पण ती नागरिकांच्या घरात आणि श्वासात शिरणारी नसावी. नृत्य असावे, पण त्यात प्रसंगाचे भानही असावे. उत्साह असावा, पण त्याला जबाबदारीची जोड असावी.कारण आई दुर्गेचा खरा जयघोष डीजेच्या आवाजात नव्हे, तर आपल्या आचरणातून ऐकू आला पाहिजे!उत्कृष्ट देखावे साकारणाऱ्या, शिस्तबद्ध मिरवणुका काढणाऱ्या आणि भक्तिभावाने देवीला निरोप देणाऱ्या सर्व मंडळांचे निश्चितच अभिनंदन. मात्र, जिथे चुका झाल्या आहेत, तिथे त्या मान्य करून पुढील उत्सव अधिक चांगला करण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे. आम्ही चांगल्या कामाचे कौतुक करू आणि चुकीच्या गोष्टींकडेही बोट दाखवू; कारण आमचा उद्देश कोणत्याही मंडळाची बदनामी करणे नसून सार्वजनिक उत्सव अधिक सुंदर, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसंस्कृत व्हावेत हा आहे.पुढच्या उत्सवात देखावेही उत्कृष्ट असावेत, भक्तीही मनापासून असावी आणि विसर्जनानंतर रस्त्यावर कचरा नव्हे, तर चांगल्या आठवणी उराव्यात—हीच अपेक्षा!

error: Content is protected !!