संत सेवालाल महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम -दासराव हंबर्डे

नांदेड -जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संत सेवालाल महाराज आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने सर्व जाती-धर्माच्या नागरिकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्लीचे राष्ट्रीय सचिव दासराव हंबर्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

प.पू. सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज यांनी देशातील 29 राज्यात सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या जय भारत माता सेवा समिती यांच्या मार्फत राष्ट्रीय एकात्मता वाढवी, देशात एकात्मतेचे दर्शन घडावे याकरिता देशातील थोर समाजसुधारकांची जयंती साजरी केली जाते. नवीन पिढीला थोर महापुरूषांचे विचार कळावे, या हेतुने नांदेड शहरामध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वामनराव पावडे मंगल कार्यालय, पूर्णा रोड येथे आयोजित केली आहे. तर दि. 19 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. सदर जयंती सोहळा भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, तरोडा नांदेड येथे आयोजित केला आहे.

या दोन्हीही महापुरूषांच्या जयंतीनिमित्त महंत साधवी मुक्ताईनाथ माऊली यांचे कीर्तन, श्री.श्री. 1008 महंत गिरी महाराज गुरू जय गिरी महाराज, संत बाबा बलविंदरसिंघ यांचा सन्मान, सेवालाल महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान व पुस्तकांचे वाटप, संविधान स्वीकारतानाचे बोधचिन्ह, थोर देशभक्त छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या जीवनचरित्रांवरील पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सर्व धर्मीयांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून महापुरूषांचे विचार वाढविण्यासाठी समाजबांधवांनी योगदान द्यावे, असेही यावेळी आयोजक दासराव हंबर्डे यांनी सांगितले. यावेळी जय भारत माता सेवा समिती जिल्हाध्यक्ष युवराज पवार, दामोदर शेट्टी, सिद्धार्थ तलवारे, सुनील इंगळे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!