नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीसांनी प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या प्रेसनोटनुसार हदगाव येथे 2 लाख 58 हजार किंमतीचा सोन्या-चांदीचे ऐवज लंपास झाला आहे. विनायकनगर भागात एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या दोन घटनांमध्ये एकूण 3 लाख 99 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
संतोष मारोती सुर्यवंशी यांचे घर कमलाईनगर हदगाव येथे आहे. 28 डिसेंबरच्या दुपारी 4.30 ते 30 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजेदरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 2 लाख 58 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 391/2024 प्रमाणे दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक रायबोले हे करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत शहरातील गुरुजी चौकाजवळ असलेल्या विनायकनगरमधील एक घर चोरट्यांनी 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतरच्या काळापासून ते 29 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेदरम्यान फोडले आहे. या घराच्या बाथरुमच्या खिडकीतील गजाळ्या काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातून सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 41 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. शिक्षक असलेले अनिरुध्द मधुकरराव शिरसाळकर यांनी तक्रार दिल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 653/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक वाडेवाले यांच्याकडे देण्यात आला आहे.
हदगाव आणि नांदेड शहरातील विनायकनगरमध्ये 4 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी
