नांदेड(प्रतिनिधी)-1 सप्टेंबर रोजी अर्धापूर पोलीसांनी पकडलेल्या संशयीत तांदळाचा ट्रक हा राशनचा तांदुळ असलेलाच ट्रक आहे. यानुसार कपील पोकर्णासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.1 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीसांनी फ्लॅश आऊट ऑपरेशन राबवित असतांना त्यांना ट्रक क्रमांक एम.एच.22 एए 3366 मध्ये स्वस्त धान्याचे साहित्य असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस अंमलदार विजय आडे, महेंद्र डांगे, विजय कदम, पोलीस अधिक्षकांचे पथक क्रमांक 6 मधील पोलीस उपनिरिक्षक प्रविण हलसे, पोलीस अंमलदार ब्रम्हानंद लांबतुरे, राम मुळे, पंढरी जाधव आदींनी जांभरुन पाटी जवळ या ट्रकची तपासणी केली. या ट्रकमध्ये तांदुळ होता. हा ट्रक अर्धापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आला आणि याबाबतची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपनिरिक्षक सुरेश भोसले यांना देण्यात आले. त्यानंतर सुरेश भोसले यांनी तपासणी करून दिलेल्या तक्रारीनुसार ट्रक क्रमांक एम.एच.22 एए 3366 मध्ये स्वस्त धान्याचा तांदुळ आहे. तसेच हा तांदुळ संगणमत करून काळ्या बाजारात पाठविला जात होता. संगणमत करणाऱ्यांमध्ये कपील पोकर्णा रा.नवा मोंढा नांदेड, शेख जाकीर शेख वजिरोद्दीन रा.मदिनानगर अर्धापूर, याहिया खान रऊफ खान पठाण रा.इंदिरानगर नांदेड शेख सोहेल शेख वजिरोद्दीन यांची नावे आहेत. या ट्रकमध्ये असलेला तांदुळ स्वस्त धान्याचा आहे. त्या संदर्भाची बनावट कागदपत्र तयार करून त्याची वाहतुक करून फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरिक्षक सुरेश भोसले यांच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 336(2), 336(3), 318, 3(5) सोबत अत्यावश्यक वस्तु अधिनियम मधील कलम 3 आणि 7 प्रमाणे अपराध क्रमांक 483/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे करणार आहेत.
संबंधीत बातमी..
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 96 हजारांचा संशयीत तांदुळ पकडला