नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पुर्ण पोलीस सेवाकाळात मनासारख वागता आलेल नसत. आता आपल्या मनाला आवडेल त्याप्रमाणे वागण्याची आणि जीवन जगण्याची संधी तुम्हा सर्वांना उपलब्ध झाली आहे अशा शब्दात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आज सेवानिवृत्त झालेल्या एक पोलीस उपनिरिक्षक, चार श्रेणी पोलीस उपअधिक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि एक पोलीस अंमलदार यांना भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या.
आज आपल्या विहित सेवाकाळाप्रमाणे नांदेड जिल्हा पोलीस दलातून पोलीस उपनिरिक्षक मधुकर पंढरीनाथ जायभाये-पोलीस नियंत्रण कक्ष,श्रेणी पोलीस उपनिरिक्षक मोहन भुमा राठोड-इतवारा, खयुम महेमुद शेख-देगलूर, उत्तम भुजंगराव वाघमारे-पोलीस मुख्यालय, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुनिल माणिकराव पांडे-मुखेड, अजीमोद्दीन शमशोद्दीन-ईस्लापूर, शेख उजेर शेख जहुर-महामार्ग सुरक्षा पथक, व्यंकट नारायण पांचाळ-पोलीस मुख्यालय,गुरुलिंग राजप्पा मठदेवरु-शिवाजीनगर आणि पोलीस अंमलदार रामेश्र्वर दिगंबर जायभाये-उस्माननगर हे सेवानिवृत्त झाले. त्यांना आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सेवानिवृत्तीचा निरोप देतांना सहकुटूंब त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पुढे बोलतांना अबिनाशकुमार म्हणाले की, पोलीस दलात काम करत असतांना आपल्या मनासारखे कोणतेच काम आपल्याला करता येत नाही पण आता सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे जीवन जगण्याची संधी उपलब्ध आहे. या संधीचे सोने करतांना समाजाला काय देता येईल याचा विचार नक्की करा. तुमच्या जीवनात तुम्ही प्राप्त केलेल्या कायदेशीर ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करता येवू शकतो. अनेकांना पोलीस ठाण्यात गेल्यावर काय अर्ज लिहुन द्यावा याची माहिती नसते. त्यांना मदत करा. आपल्या कुटूंबातील ज्या व्यक्तींना तुम्ही वेळ दिला नाही त्यांना वेळ द्या आणि त्या लोकांना सुध्दा तुमच्या पुढील जीवनाच्या आनंदात सहभागी करून घ्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरिक्षक माया भोसले यांनी केले. पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.