विद्यार्थ्यांना ‘भारतविद्या’ व्यासपीठावरून प्राचीन इतिहास व संस्कृतीचा अभ्यास करता येणार नांदेड़ -राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बहुशाखीय अध्ययन, भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्थात्मक सहकार्याला चालना देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि पुणे येथील नामांकित भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांच्यात दि.१९ मे, २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या अधिकृत ‘भारतविद्या’ या ऑनलाईन शिक्षण व्यासपीठावरील अभ्यासक्रम आता विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास, संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि प्राचीन लिपींचा अभ्यास करण्यासाठी नवे शैक्षणिक दालन खुले झाले आहे. या संयुक्त उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात तीन अभ्यासक्रम निवडता येणार असून त्यामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती’, ‘परिचय भारतीय ज्ञान परंपरेचा’ आणि ‘मोडी लिपी’ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या ऐतिहासिक कराराबाबत आनंद व्यक्त करताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा, इतिहास आणि लिपी यांचा सखोल अभ्यास करण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. भांडारकर प्राच्य संशोधन संस्था ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त संस्था असून तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन, ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन, विश्लेषण आणि शास्त्रीय मांडणी यांसारखी कौशल्ये विकसित होतील. यामुळे त्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रगतीलाही निश्चितच नवे बळ मिळेल.” सदर सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण आणि कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे मोलाचे योगदान लाभले. तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. एम. के. पाटील, नवोन्मेष, उद्योग संलग्नता व दुवा केंद्राचे संचालक डॉ. शैलेश वाढेर तसेच भारतविद्याचे प्रतिनिधी चिन्मय भंडारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यापीठ परिसरात तसेच इतिहास, संस्कृती आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या सहकार्याकडे एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम म्हणून पाहिले जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 653 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ११.७३ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या, थोडी खुशी, थोडा गम वातावरण का म्हणाले पहिल्यांदा खा. राहुल गांधी की येत्या वर्षभरात केंद्र सरकार पडणार