नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सोनखेड बसस्थानकाजवळून एका आयुर्वेदिक औषधी विक्रेत्याची चार चाकी गाडी बळजबरीने पळवून नेणाऱ्या 22 वर्षीय युवकाला सोनखेड पोलीसांनी काही तासातच ताब्यात घेतले आहे.
जोगिंदरसिंह सुलतानसिंह चितोडीया याने दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास सोनखेड बसस्थानकाजवळून एका अनोळखी युवकाने त्यांची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.02 एमए 3109 ही चाकूचा धाक दाखवून बळजबरीने चोरू नेली आहे. गुन्हा दाखल होताच सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार विश्र्वनाथ हंबर्डे, रमेश वाघमारे आणि देवकते यांच्यासह सोनखेड येथील ग्राम रक्षा दलाचे सदस्य आदींनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. त्यानुसार बोरगाव रोड सोनखेड येथे राहणारा गजानन रमेश पवार (22) याने ही चार चाकी गाडी बळजबरीने चोरू नेली होती. पोलीसांनी विविध प्रकारे या बाबतची माहिती जमवली असता तेंव्हा तो कलंबर रोड टेळकी शिवारातून पुढे गेल्याची माहिती मिळाली.सोनखेड पोलीसांनी त्या रस्त्यावर पाठलाग करून काही तासातच गजानन रमेश पवारला जेरबंद केले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी सोनखेड पोलीसांचे उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केले आहे.