नांदेड(प्रतिनिधी)-पुणेगाव येथे एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एका आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड तसेच इतर तिघांना पाच वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकास 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.पटवारी यांनी ठोठावली आहे.
पुणेगाव येथील सन 2021 मध्ये सरपंच असलेले हनुमंत संभाजीराव पुयड यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयातून दिलेल्या जबाबानुसार 15 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास ते, त्यांचा भाऊ संदीप आणि मित्र धनंजय भोसले असे एका कार्यक्रमात आमदुरा येथे गेले होते. सायंकाळी 5 वाजता हनुमंत पुयड, गुरूनाथ कदम, आनंदा पुयड, संदीप कदम पुणेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसले होते तेंव्हा शिवराज पुयड याने सांगितले की, संदीपला रणजित, सर्जेराव, संजय आणि भानुदास हे सर्व मिळून गावाकडे येणाऱ्या पुलावरील रस्त्यावर मारहाण करीत आहेत. म्हणून आम्ही सर्व जण तिकडे पळालो. तेंव्हा रणजित, सर्जेराव हे लोखंडी रॉडने तसेच संजय आणि भानुदास हे काठीने भाऊ संदीप व धनंजय भोसले यांना मारहाण करीत होते. त्यावेळी मला पाहुन तु आमच्या चुलत्याच्या विरुध्द ग्राम पंचायत निवडणुकीत उभे राहुन सरपंच झालास काय, तुला तर जिवंत मारतो असे म्हणून मला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने माझ्या डोक्यात मारले. माझ्या डाव्या हातावर मारले. हात फॅक्चर झाला. त्यावेळी भानुदास पुयड याने याला सोडू नका, जिवे मारुन टाका असे म्हणत होता. तेंव्हा सर्जेराव पुयडने त्याच्या हातातील रॉडने मला जिवेमारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारले. त्याचवेळी भानुदास पुयड, संजय पुयड यांनी त्यांच्या हातातील काठीने डोक्यात, हातावर, पाठीवर, पायावर मारहाण केली. त्यामुळे मला चक्कर आली आणि मी बेशुध्द पडलो.
या तक्रारीनुसार नंादेड ग्रामीण पोलीसांनी रणजित भानुदास पुयड, सर्जेराव भानुदास पुयड, संजय गोविंदराव पुयड आणि भानुदास मोतीराम पुयड यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 326, 324 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 298/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात यांनी केला होता. चार आरोपींविरुध्द त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याला सत्र खटला क्रमांक 177/2022 असा क्रमांक मिळाला. आरोपीविरुध्द दोषसिध्दीकरण्यासाठी सरकार पक्षाने 11 साक्षीदार न्यायालयासमक्ष बोलावले आणि त्यांचा पुरावा दाखल करून घेतला. या प्रकरणात न्यायालयासमक्ष आलेला पुरावा आणि सादर करण्यात आलेला युक्तीवाद ऐकून न्या.आर.एम.पटवारी यांनी आरोपी रणजित भानुदास पुयड भारतीय दंड संहितेच्या कलम 307 नुसार 7 वर्ष सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपी सर्जेराव भानुदास पुयड, संजय गोविंदराव पुयड आणि भानुदास मारोती पुयड या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 326 नुसार 5 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकाला 10 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी काम पाहिले. तसेच फिर्यादी हनुमंत संभाजी पुयड आणि इतर जखमींच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.बी.आर.भोसले आणि ऍड.विनोद कदम यांनी बाजू मांडली. नांदेड ग्रामीण येथील पोलीस अंमलदार चंद्रकांत पांचाळ यांनी पैरवी अधिकाऱ्याचे कर्तव्य पार पाडले.