नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. सर्वच पक्ष संघटना आप-आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. आज हदगाव येथे भारतीय जनता पार्टीचा महामेळावा सुरू असून त्यात हदगाव विधानसभेची जागा भाजपला मिळाली नाही तर 10 भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आत्मदहन करणार असल्याचे सुर ऐकायला मिळाले.
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे, विधानसभा निवडणुक प्रमुख सुधाकर भोयर, कैलास राठोड, विधानसभा अध्यक्ष निळू पाटील, तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे, सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक चांगूनराव बोईनवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या अधिवेशनात उपस्थित आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आप-आपल्या पक्षाची वर्णी लागावी म्हणून सर्व पक्ष संघटना कामाला लागल्या आहेत. आज हदगाव येथे भारतीय जनता पार्टीचा महामेळावा सुरू आहे. त्यामध्ये सर्वांनी आप-आपले मत प्रवाह व्यक्त केले. यामध्ये सर्वात महत्वाचा मतप्रवाह असा आहे की, मागील विधानसभेच्यावेळेस हदगाव विधानसभा शिवसेना पक्षाकडे होती. त्यानंतर शिवसेनेचे दोन पक्ष झाले, भारतीय जनता पार्टी स्वतंत्र पक्ष राहिली, राष्ट्रवादी कॉंगे्रस पाटीचे दोन पक्ष झाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकी मध्ये मोठी अवघड परिस्थिती तयार होत आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉंगे्रस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे आणि इतर अशा राजकीय पक्षांसोबत ही निवडणुक लढविणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या किती उमेदवारांना 288 पैकी जागा मिळतात ही सुध्दा बाब महत्वपुर्ण आहे. हदगाव येथे सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महामेळाव्यात हा सुर ऐकायला मिळाला की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हदगाव विधानसभा मतदार संघ हा भारतीय जनता पार्टीलाच मिळाला पाहिजे. यदा-कदा तो मिळाला नाही तर भारतीय जनता पार्टीचे दहा पदाधिकारी आत्मदहन करणार आहेत.अधिवेशनाची सर्व हकीकत वरिष्ठापर्यंत पोहचेल तेंव्हा निर्णय तर तिथेच होईल. परंतू भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय व उठवलेला आवाज हा महत्वपुर्ण आहे.