नांदेड(प्रतिनिधी)-सोहेल कॉलनी, आसरानगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 32 हजारांचा ऐवज लांबवला आहे. हारुनबाग माळटेकडी रस्त्यावर चोऱ्यांनी घरफोडून 2 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.कुंडलवाडी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 46 हजारांचा ऐवज लांबवला आहे.राठी चौक हदगाव येथे एक सराफ दुकान फोडून चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज चोरला आहे. गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी विद्यालयातून एक लॅपटॉप चोरीला गेला आहे त्याची किंमत 15 हजार रुपये आहे. हिमायतनगर तालुक्यातून वडगाव शिवारातून चोरट्यांनी वीज वितरण कंपनीचे तार चोरले आहेत त्यांची किंमत 25 हजार रुपये आहे.
शबीर हसन खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 ऑगस्टच्या सकाळी 11 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातून 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. विमानतळ पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 306/2024 प्रमाणे नोंदवला असून पोलीस उपनिरिक्षक सचिन साने अधिक तपास करीत आहेत.
हारुनबाग माळटेकडी रस्त्यावरील मोहम्मद मुकीद मोहम्मद अफजल यांचे घर चोरट्यांनी 5 ऑगस्टच्या सकाळी 7 ते 6 ऑगस्टच्या रात्री 9.30 वाजेदरम्यान फोडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 2 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. इतवारा पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 306/2024 नुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
आवेस मोहम्मद शेख यांचे कुंडलवाडी येथील घर चोरट्यांनी फोडून 7 ऑगस्ट रोजी त्यातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 46 हजार रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. कुंडलवाडी पोलीसांनी हा घटना क्रम गुन्हा क्रमांक 129/2024 नुसार नोंदविला असून पोलीस उपनिरिक्षक शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
हदगाव येथील राठी चौक भागात असलेले शरद नरहरी उदावंत यांची सोन्या-चांदीचे दुकान 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी फोडून यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. हदगाव पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 232/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार पांढरे अधिक तपास करीत आहेत.
श्री गुरू गोविंदसिंघजी महाविद्यालयातील विद्यार्थीनी रुची प्रमोद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या कॉलेजमधील देवगिरी हॉस्टेलमध्ये राहतात. 6 ऑगस्टच्या रात्री 8 ते 7 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेदम्यान त्यांच्या बॅगमधील 15 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप कोणी तरी चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 702/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
हिमायतनगर जवळील वडगाव शिवारातून चोरट्यांनी 5 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट रोजी वीज वितरणच्या सात खांबांचे नुकसान करून त्यावर लावलेले जर्मन वायर चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार कनिष्ठ अभियंता शुभम सुरेश कळसकर यांनी दिलेल्यानंतर हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 2024/2024 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सुरकुटे अधिक तपास करीत आहेत.