नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, अर्धापूर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या पाच स्वतंत्र घटना घडल्या असून, अज्ञात चोरट्यांनी मिळून सुमारे ₹3.43 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.
मुखेड तालुक्यातील अशोकनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ₹22,140 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देगलूर शहरातील तोटावार गल्ली येथे घरफोडी करून ₹10 हजारांची रोख रक्कम लंपास करण्यात आली. तसेच देगलूर येथील एसबीआय बँकेजवळ मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेल्या पिशवीतील ₹1.50 लाखांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.अर्धापूर तालुक्यातील मोजेर येथे शेतातील गोदामात प्रवेश करून १२ क्विंटल हळद (किंमत ₹72 हजार) चोरीस गेली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील ₹39,400 किमतीचे सोन्याचे पोत चोरट्यांनी लंपास केले.
या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी घर व मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
