मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात

*९६ टेबलवर नांदेडमध्ये होणार मतमोजणी* 

नांदेड : -4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी मतमोजणी सकाळी आठ वाजता पासून सुरू होणार आहे.

 

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा बैठक घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत होणार आहे.

 

मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात येत आहे.

 

सध्या शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.

 

*५०० कर्मचारी नियुक्त*

मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात. मात्र जवळपास 500 कर्मचारी आतमध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असतील. तेवढेच पोलीस अधिकारी कर्मचारी सुरक्षा यंत्रणे संदर्भात काम करणार आहे.

 

*८ वाजता मतमोजणीला प्रारंभ*

 

सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारणतः साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे.

 

मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डोळ्यात तेल घालून संपूर्ण यंत्रणेकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात. 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.

 

*किती टेबलवर मतमोजणी होणार ?*

 

नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. एका विधानसभा साठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी १२ टेबल आहेत. थोडक्यात नांदेड जिल्ह्याची मतमोजणी 96 टेबलवर होणार आहे.

 

*कोण करते मतमोजणी?*

 

प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात.यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक , दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिटंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई. सहाय्य करण्यासाठी. या प्रत्येक पदाचे जवळपास प्रत्येकी१०० कर्मचारी कार्यरत असतात.

यामधील सूक्ष्म निरीक्षक हे बँकेचे कर्मचारी असतात. सुपरवायझर हे साधारणतः अभियंते असतात. हिशेब ठेवण्यासाठी लागणारे मतमोजणी सहाय्यक महसूल विभागाचे तलाठी असतात व यांना पेट्या वगैरे आणून देण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक शिपाई तैनात केला असतो.

 

*एकूण फेऱ्या कशा ठरतात?*

 

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किती केंद्र आहे त्याला भागीले टेबलची संख्या यावरून फेऱ्या ठरतात. उदाहरणार्थ 87 नांदेड विधानसभा क्षेत्रात 312 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे 312 भागीले 14. बरोबर 22.28 म्हणजे 23 फेऱ्या होतील.

थोडक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 23 तर सर्वात अधिक 26 फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.

 

*एका फेरीला किती वेळ लागेल..?*

 

एका फेरीला साधारण अर्धा तास लागतो. मात्र मतमोजणी कर्मचाऱ्यांना पुढे पुढे सराव झाल्यामुळे त्यापेक्षा कमी वेळ लागतो.

नांदेडमध्ये साधारणतः आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा अंदाज निकाल दहा -साडेदहा पर्यंत येईल, असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *