नांदेड बिदर महामार्गावर भीषण अपघात पती-पत्नी व मुलगा जागीच ठार

मुक्रमाबाद(प्रतिनिधी)-मुक्रमाबाद पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 (अ) वर बिहारीपुर जवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच वर्षीय चिमुकल्या मुलाला उदगीर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत त्याचाही मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि.23 रोजी दुपारी 3 वाजता च्या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुखेड तालुक्यातील परतपूर फाटा येथील मोसिन गनीसाब शेख वय (30) पत्नी फरिदा मोसीन शेख (वय 28) व जुनेद मोसिन शेख (वय 5) हे मुखेडहून मुक्रमाबाद कडे येत असताना बिहारीपुर गावाच्या जवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची जबर धडक लागल्याने दुचाकी वरील पती-पत्नी जागीच ठार झाले तर पाच वर्षीय मुलाला उदगीर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली.
तिघांचेही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रमाबाद येथे आणले असून शवविच्छेदन व पोलीस पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.यावेळी पोलीस उपनिरीक्षक चांद सय्यद, गोपनीय शाखेचे माधव मलगिरवार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.हा अपघात नेमका कसा घडला किंवा दुचाकी स्वराला कोणत्या गाडीने उडवले का कोणाला साईड देण्याच्या नादात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रॅक्टर आदळून हा अपघात झाला याचा शोध मुक्रमाबाद पोलीस घेत आहेत.
घटनास्थळाला मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली असता मुखेड कऊन मुक्रमाबाद कडे येत असताना रोडच्या कडेला उभी असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची जबर धडक बसल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती स.पो.नी. तिडके यांनी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *