वजिराबाद गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकाकडून चोरीच्या दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली दुचाकी बेवारस अवस्थेत वजिराबाद पोलीसांना सापडली.
नांदेड(प्रतिनिधी)-एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून वजिराबाद गुन्हे शोध पथकाने दोन चोरीच्या दुचाकी गाड्या पकडल्या आहेत. या दोन दुचाकीच्या चोरीचे गुन्हे वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच वजिराबाद पोलीसांनी बेवारस दुचाकी ताब्यात घेतली आहे. त्या बाबतचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.16 मे रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाणे, पोलीस अंमलदार शरद सोनटक्के, माधव नागरगोजे, बालाजी कदम, शेख इमरान, रमेश सुर्यवंशी पाटील, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार पाटील आणि मेघराज पुरी हे गस्त करत असतांना छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकाजवळ एक अल्पवयीन बालक आपल्या ताब्यात बिना क्रमांकाची दुचाकी गाडी बाळगूण त्यावर स्वार होवू जात असतांना दिसला. वजिराबाद गुन्हे शोध पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याच्याकडे चोरी केलेल्या एकूण तीन दुचाकी गाड्या सापडल्या.त्यातील दोन दुचाकी गाड्यांचे गुन्हे वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
तसेच वजिराबाद पोलीस गस्त करत असतांना त्यांनी तिरंगा चौकात एक बेवारस दुचाकी शोधली या संबंधाने माहिती घेतली असता त्या दुचाकीचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहे. ती बेवारस दुचाकी वजिराबाद पोलीसांनी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिली आहे.
दुचाकी गाड्यांचे तिन गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, शहर उपविभागाच्या पोलीस सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम., वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम आदींनी आपल्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. पकडलेल्या दुचाक्यांची किंमत 2 लाख 30 हजार रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *