विजय कबाडे यांच्या उत्कृष्ट तपासानंतर सेवानिवृत्त शिक्षक जफर अली खान पठाणला शिक्षा व 1 लाख रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2015 मधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मनपा आयुक्त सुशिलकुमार खोडवेकर यांच्याबद्दल जातीचा उल्लेख करून निवेदने देण्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ऍट्रॉसिटी प्रकरणाचा उत्कृष्ट तपास करून त्याचे दोषारोप पत्र तत्कालीन पोलीस उपअधिक्षक विजय कबाडे यांनी पाठविले. या प्रकरणात विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी जफर अली पठाणला 6 महिने कैद आणि 1 लाख रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या दंडाच्या रक्कमेतील 75 हजार रुपये रक्कम मनपा आयुक्त सुशिल खोडवेकर यांना देण्यास सांगितले आहे.
दि.13 एप्रिल 2015 ते 20 एप्रिल 2015 या दिवसादरम्यान सेवानिवृत्त शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता जफर अली खान महेमुद अली खान पठाण (74) यांनी अत्यंत घाणेरड्या शब्दात सुशिलकुमार खोडवेकर यांचे वर्णन करून त्यांच्याविरुध्द अनेक निवेदने दिली. महानगरपालिका कार्यालयात इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर अत्यंत घाणेरड्या शब्दात त्यांचा पाणउतारा होईल असे वर्णन केले. सुशिलकुमार खोडवेकर यांनी 20 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 3(1)(10) नुसार गुन्हा क्रमांक 44/2015 दाखल करण्यात आला. या प्रकरणात तत्कालीन पोलीस उपअधिक्षक तथा सध्या सोलापूर शहर येथे पोलीस उपआयुक्त असलेले विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक संजय निकम यांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
न्यायालयात हा खटला क्रमांक 17/2015 या क्रमांकानुसार चालला. त्यात या खटल्यात सुशिलकुमार खोडवे, सहाय्यक आयुक्त विजय मारोती मुंडे, स्विय सहाय्यक श्रीरंग संभाजी पवळे, सहाय्यक आयुकत संजय नारायण जाधव, नगरपालिकेतील कर्मचारी प्रमोद दादासाहेब देशमुख, पोलीस उपअधिक्षक विजय व्यंकटराव कबाडे आणि संजय शामराव निकम अशा 7 जणांनी आपल्या साक्षी नोंदवल्या. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. आज शेवटच्या दिवशी सहाय्यक सरकारी वकील ऍड.अब्बास हे उपस्थित होते. न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या प्रकरणाचा निकाल देतांना ऍट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(10) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 499, 500 अर्थात बदनमी करणे यासाठी जफर अली खान पठाणला दोषी माणुन दोन वेगवेगळ्या कायद्यांमध्ये प्रत्येकी 6 महिने शिक्षा आणि दोन कायद्यांमध्ये प्रत्येकी 50 हजार रुपये रोख असा 1 लाख रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात जफर अली खान पठाण यांनी स्वत:च आपली बचावाची बाजू मांडली होती. दंडाच्या 1 लाख रुपयांपैकी पैसे जमा झाल्यानंतर त्यातील 75 हजार रुपये रक्कम मनपा आयुक्त सुशिलकुमार खोडवेकर यांना देण्याचे आदेश न्यायाधीश बांगर यांनी दिले आहेत.या खटल्यात वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात पेालीस अंमलदार जितेंद्र तरटे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका वठवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *