जिल्ह्यात तीन ठिकाणी 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या तीन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या चोऱ्या झाल्या आहेत.
लईखोद्दीन हबीबोद्दीन शेख हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. दि.24 एप्रिल रोजी त्यांनी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान तारासिंग मार्केट येथील एसबीआय बॅंकेसमोर आपली दुचाकी उभी केली आणि बॅंकेतून 1 लाख रुपये काढले. ते 1 लाख रुपये डिक्कीत ठेवले आणि पुन्हा एटीएमकडे गेले तेथून त्यांना 20 हजार रुपये काढायचे होते. काढलेले 20 हजार रुपये डिक्कीत ठेवण्यासाठी डिक्की उघडली असता.पहिले ठेवलेले एक लाख रुपये गायब झालेले होते. वजिराबाद पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक किरवले अधिक तपास करीत आहेत.
सौ.सरस्वती बालाजी बिरादार ह्या कर्नाटक राज्यातील महिला 25 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मुखेड बसस्थानकातून नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत असतांना गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, किंमत 49 हजार रुपयांचे काढून घेतले. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कदम अधिक तपास करीत आहेत.
पत्रकार संजयकुमार निवृत्तीराव पोवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आंबेडकरनगर बिलोली येथे राहतात. 24 एप्रिलच्या रात्री 11 ते 25 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजेदरम्यान ते आपल्या घराचा दरवाजा व खिडक्या उघड्या ठेवून झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि खुंटीला अडकवून ठेवलेेल्या पॅन्टमधील 16 हजार रुपये रोख रक्कम कोणी तरी चोरट्यांनी काढून घेतली आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मुत्तेमवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *