मतदानाच्या दिवशी मतदारांची अडचण सोडविण्यासाठी पोलीस कटीबध्द-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-मतदारांच्या सुविधांसाठी, त्यांना भिती वाटणार नाही अशा मुक्त वातावरणासाठी आणि निष्पक्ष निवडणुक व्हावी यासाठी पोलीस सज्ज असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. कोणत्याही मतदाराला काहीही अडचण आली तरी ते समोर दिसणाऱ्या पोलीसाला आपली अडचण सांगू शकतील असे श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले.
नांदेड जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधिक्षक-1, अपर पोलीस अधिक्षक-2, पोलीस उपअधिक्षक-12, पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक-240 पेक्षा जास्त, पोलीस अंमलदार-4 हजार 200 पेक्षा जास्त, गृहरक्षक दलाचे जवान-2हजार 500 सोबतच राज्य राखीव पोलीस बलगट आणि केंद्रीय राखीव पोलीस- 6 कंपन्या अशा पध्दतीचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
यासोबतच एक अधिकारी आणि काही पोलीस अंमलदार यांच्यासह एक गस्तीवाहन प्रत्येक बुथवर काही मिनिटात पोहचेल अशी सोय करण्यात आली आहे. हे गस्तीपथक सायंकाळी मतदान संपेपर्यंत काम करेल. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस अंमलदार, एक गृहरक्षक दलाचा जवान अशी तैनातील करण्यात आली आहे. संवेदनशिल मतदान केंद्रांवर दुप्पटीने पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
मतदान करतांना, घरुन मतदान केंद्रावर जातांना, मतदान केंद्रावरून घरी परत येतांना मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचणी आली तर ते आपली अडचण गस्ती पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना सांगू शकतात. मतदारांची अडचण सोडविण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *