” जागतिक हिवताप दिन ” २५ एप्रिल 

जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्वस्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून ” जागतिक हिवताप दिन ” २५ एप्रिल हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण आहे. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व ईतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने २५ एप्रिल हा दिवस ” जागतिक हिवताप दिन ” म्हणून घोषित केलेले आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने थोडक्यात पुढील प्रमाणे माहिती.

” जागतिक हिवताप दिन ” २५ एप्रिल २०२४ यावर्षीचे घोष वाक्य

” Accelerating the Fight Against Malaria for a more Equitable World ”

” मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करू या लढा मलेरिया हरविण्यासाठी ! ” या घोष वाक्यासह साजरा करण्यात येणार आहे. घोषवाक्य घेऊन जागतिक हिवताप दिन साजरा करीत असतांना त्या काळची आठवण झाली तेव्हा सहज लोक उपहासात्मक बोलयचे की एक मच्छर आदमी को….. बना देता है. हिवताप अर्थात मलेरिया मले एरिया (मध्ययुगीन इटालियन मधील खराब वायु) पासून हे नाव मलेरियाच्या लक्षनानुसार प्राप्त झाले ही कल्पना प्राचीन रोमनांकडून आली होती ज्यांनी असा विचार केला की हा रोग भयानक धुळीपासुन आला आहे.तसा मलेरिया हा आजार फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. खिस्तपूर्व पाचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहित होता. हिवतापाच्या लक्षणाने त्याकाळात लाखो लोकांचे मृत्यु होत असत लोक लक्षणानुसार उपलब्ध उपचार करीत असत पुढे शतकानु शतके पुर्ण जगात हीच परंपरा सुरु होती. या आजाराचे कारण त्या काळात कोणासही कळत नव्हते. तेव्हा इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासाचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्यांचा शोध त्यावेळी लागला नव्हाता. इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असुन तो या जंतूंनी युक्त पसरवीत असावेत अशा घटना सुरु असतांना आपल्या भारतात सन १३ मे १८५७ अलमोडा उत्तर भारत प्रदेश नेपाळ सिमेवर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते, त्यांचे प्राथमिक शिक्षण भारतात पूर्ण करुन ते पुढे वैद्यकिय शिक्षणासाठी इंग्लडमध्ये गेले पुढे एम. बी.बी.एस पूर्ण करुन भारतात इंडीयन मेडीकल सर्विस मध्ये वैद्यकिय अधिकारी पदावर चेन्नई येथे रुजु झाले त्या काळात हिवताप सदृश्य आजाराने भारतात देखील थैमान घातलेले होते या आजाराच्या संशोधनासाठी ते पुन्हा इंग्लड येथे गेले त्या ठिकाणी डॉ. मेन्सन पॅट्रीक व डॉ. लॉथरन हे त्या ठिकानी मलेरिया वर संशोधन करीतच होते. तेथे प्राथमिक संशोधन करुन पुन्हा भारतात सिकंदराबाद येथील छावणीत नोकरी स्वीकारुन मलेरिया वर संशोधन सुरु ठेवले तेव्हा सिकंदराबाद येथील बेगमपेठ येथे त्यांना तपकिरी रंगाचे डास (अर्थात अँनॉफीलीस) सापडले तेव्हा त्यांनी २० ऑगस्ट १८९७ ला जगासमोर (ब्रिटीश मेडीकल जनरल) निश्चित कारण ठेवले कि हिवताप हा आजार अँनाफीलीस नावाच्या डासामुळे नेमका कसा होतो व पुढे सन १९०० मध्ये मलेरियावर उपचारासाठी शिकोना या झाडापासुन क्युनाईन नांवाचे औषण तयार केले याच कारणास्तव सर रोनाल्ड रॉस यांना सन १९०२ मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने मन्मानीत करण्यात आले.

इस १९०० मध्ये आपणास माहित होते मलेरियाचे कारण पुढे यावर सतत संशोधन सुरु होते भारतात देखील हा आजार आटोक्यात येत नव्हता मलेरीयाच्या साथी होत असत व असंख्य बळी जात असत तसेच मलेरीयाचे जे दुष्परीनाम वेगवेगळ्या वयोगटातील दिसुन येत ते काही कमी होत नव्हते. स्वातत्र्यानंतर हिवतापाचे अंदाजे चाषिक प्रमाण ७५ दशलक्ष होते आणी ०.८ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले अशा गंभीर समस्याचा सामना करीत असतांना तेव्हा पुढे भारत सरकारणे प्रथमतः १९५३ मध्ये राष्ट्रिय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम सुरु केला पुढे आवश्यकते नुसार व प्रत्येक काळातील वेगवेगळ्या भौगोलीक बदल, वातावरण बदल, स्थलांतर प्रमाणात वाढ, शहरीकरण, प्रदुषन, उपलब्धता, कमतरता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हिवताप कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आले.

हिवताप या आजाराचा नायनाट करण्यासाठी कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी, हिवतापा विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करून व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी त्यांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस ” जागतिक हिवताप दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो.

हिवताप या आजाराचा प्रसार अँनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा.भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी पाण्याच्या टाक्या, कालवे ईत्यादी मध्ये होते. या आजाराचे लक्षणे थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येवू शकतो, ताप नंतर घाम येवून अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. या आजाराचे निदान हे प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून करता येते. तात्काळ निदान पध्दती आर.डी.के. (Rapid Dignostic Kit) apt) द्वारे स्पॉटवर रक्त नमुना घेऊन पी.एफ./ पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो. म्हणून प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्तनमुना नजिकच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासून घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्विन व प्रायमाक्विन गोळयाचा औषधौपचार घ्यावा.

भविष्यात हिवताप आजाराचे उद्रेक होवू नये म्हणून आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आलेले असून हिवताप आजारावर मात मिळवण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्याकरिता पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे.राज्यांच्या सततच्या आणि सामूहिक प्रयत्नांमुळे, देशान हिवताप प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट केली आहे.

-: सर्वसाधारण माहिती :-

हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतूपासून होतो. जगामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे ३०० ते ५०० दशलक्ष लोकांना हिवताप होतो. हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफरम व व्हायव्हाँक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस डासाच्या मादीमार्फत होतो. हिवतापाचा अधिशयन काळ हा १० ते १२ दिवसाचा आहे.

(1) हिवताप (Malaria) :- लक्षणे :-

थंडी वाजून ताप येणे.

ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो.

नंतर घाम येऊन अंग गार पडते.

ताप आल्यानंतर डोके दुखते.

बऱ्याच वेळा उलट्याही होतात.

(2) मेंदूचा हिवताप ( Cerebral Malaria) :-

फॅल्सीफेरम प्रकारच्या हिवतापात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवताप होऊ शकतो.

-: लक्षणे :-

तीव्र ताप,

तीव्र डोकेदुखी / व उलट्या होणे.

मान ताठ होणे.

झटके येणे,

बेशुद्ध होणे.

-: रोगनिदान :-

१) प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून घेणे.

२) तत्काळ निदान पद्धती ( Rapid Diagnostic Kit)

हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्तनमुना तपासून करता येते.

वरील रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळून येतात.

-: रोगजंतूची माहिती :- रोग प्रसार कसा होतो

हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस जातीच्या मादी डासांमार्फत होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठून राहिलेल्या उदा. स्वच्छ पाण्याची डबकी, भात शेती, नाले , नदी, पाण्याच्या टाक्या इ. मध्ये होते.डास हिवताप रुग्णास चावतो त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन ते जंतु डासाच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. मनुष्याच्या शरीरात हे जंतू लिव्हर मध्ये जातात तेथे त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडीवाजुन ताप येतो.

-:- प्रतिबंधात्मक उपाययोजना -:-

हिवताप प्रसारक अँनाफिलीस डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. डास स्वच्छ पाण्यात सुमारे १५० – २०० अंडी घालतात. अंडी, अळ्या, कोष, प्रौढ डास हे डासाचे जीवन चक्र आठ ते दहा दिवसात पूर्ण होते. म्हणून डास उत्पत्ती थांबवण्यासाठी नागरिकांनी खालील उपाय योजना केल्या पाहिजेत.

• पाणी साठविण्याची भांडी घट्ट झाकून ठेवा. आठवड्यातून एकदा सर्व पाणी साठे आतून घासून-पुसून कोरडे करा व दुसऱ्यादिवशी पाणी भरा.

• नारळाच्या करवंट्या, टायर, बाटल्या व प्लास्टिक डबे नष्ट करा व यामध्ये पाणी साठा होऊ देऊ नका.

• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा किंवा डासांना पळून लावणाऱ्या अगरबत्या, मँटचा वापर करा.

• घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा. सांडपाण्याची विल्हेवाट शोषखड्यातून लावा. परसबाग फुलवा.

• घराच्या परिसरातील डबकी बुजवा किंवा वाहती करा.

• घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा.

• मोठ्या पाणीसाठ्‌यामध्ये गप्पी मासे सोडा.

• सेप्टी टँक च्या व्हेटपाईपला वरच्या बाजूला नायलॉन जाळी बसून घ्या व डास उत्पत्ती थांबवा.

• नेहमी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत.

• आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका.

• घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करून रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरड्या करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.

• आंगन व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.

• झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरून घेऊन झोपावे.

• संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.

• आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारून घ्यावे.फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) करू नये.

• घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप , मडकी, ईत्यादी ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या व्हेट पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, तर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

वरील सर्व उपाय योजनांचा अवलंब केल्यास डासामार्फत प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू , हत्तीरोग, चिकनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर या आजारापासून आपण मुक्त होऊन व आपल्या भावी पिढ्यांना आरोग्यदायी जीवनाचा अमूल्य ठेवा देऊ. तसेच वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दुर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात येत आहे.

सत्यजीत टिप्रेसवार,

आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) तालुका मुदखेड जि. नांदेड

– आरोग्य निरीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर जि. नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *