बुधवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडवणार

*जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त*

नांदेड  :- 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार असून 26 एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त करण्यात आला असून निर्भय वातावरणात मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

जिल्हा प्रशासनाने आज सर्व यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विभाग प्रमुखांची व भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दाक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, यांच्यासह हिंगोली मतदारसंघात येणाऱ्या किनवट व हादगाव येथील सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याशी यावेळी तयारी बाबतची चर्चा केली.

 

*एकूण 18 लक्ष 51 हजार मतदार*

नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये भोकर (२९४४०९), नांदेड उत्तर (३४६८८६), नांदेड दक्षिण (३०८७९०), नायगाव (३०१२९९), देगलूर (३०३९४३), मुखेड (२९६५१६) असे एकूण 18 लक्ष 51 हजार 843 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये 9 लक्ष 55 हजार 84 पुरुष तर 8 लक्ष 96 हजार 617 महिला तर 142 तृतीय पंथीचा समावेश आहे. 2062 केंद्रावर हे मतदान होणार आहे.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये 144 कलम लागू होईल. याची नोंद घेण्याेचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरिता जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

 

*बुथ व्यवस्थापन महत्वाचे*

यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे.

 

*कडेकोट बंदोबस्त*

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठीकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

 

*राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध*

प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्या चे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे.

 

*मोबाईल वापरावर बंदी*

मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आयोगाने ज्यांाना अधिकारी दिले आहे त्यांाच्याप व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्यां चे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

*सार्वजनिक सुटी ; बाजार बंद*

26 एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरु असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 26 एप्रिल शुक्रवार रोजी बंद ठेवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आठवडी बाजार होते त्या ठिकाणीचे बाजार दुसरे दिवशी घेण्यात येणार आहे.

 

*48 तास मद्य विक्री बंद*

कायदा सुव्यवस्थेसाठी बुधवारच्या सायंकाळी सहा वाजता पासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे.

 

*रेडिओ संदेश बल्क एसएमएस बंदी*

48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *