स्थानिक गुन्हा शाखेने गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडले

 

नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोवर्धन घाट परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह एकास अटक केली.

दि. 13 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे हे पथकासह वजीराबाद हद्दीत गस्त घालत असताना गोवर्धन घाट पुलाखाली एक जण गावठी कट्टा व जिवंत काडतुस घेऊन थांबला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पथकाने सापळा रचून मंगेश घनश्याम सोनसळे वय 36 वर्षे, राहणार राहुल नगर, सिडको यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गावठी कट्ट्या बाबत मंगेश सोनसळे याची विचारपूस केली असता सदरील गावठी कट्टा त्याने त्याचा मित्र शेख अहमद उर्फ शेख असलम व त्यांची पत्नी यांच्याकडून 20 हजार रुपयात खरेदी केल्याचे सांगितले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस अमलदार राजीव बोधगिरे, शेख इसराइल, साहेबराव कदम, अनिल बिरादार, अकबर पठाण यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *