लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन, पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र

 पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनीही घेतला जिल्ह्याचा आढावा

नांदेड – १६-नांदेड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या कार्यासाठी आता सज्ज झाला आहे. तुम्ही सर्वांनी उत्तम तयारी केली आहे. पुढील काही दिवस डोळ्यात तेल घालून प्रशासन व पोलीस यांनी एकत्रित समन्वय आणि काम करा, असे आवाहन सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज सर्वसाधारण निरीक्षक शशांक मिश्र, पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्याच्या निवडणूक तयारीचे सादरीकरण यावेळी केले. याशिवाय सीईओ मीनल करनवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विभाग प्रमुखांनी सादरीकरण केले.

जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कठोरपणे हाताळा आणि कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने निवडणूक काळात संवेदनशीलतेने समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनी यावेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेपासून तपासणी पथकाच्या तत्परतेबाबत आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यरत असून स्थानिक गुन्हे क्षेत्र व या ठिकाणीची वारंवारता याबद्दल उत्तम माहिती असणारे आहात. त्यामुळे उत्तम समन्वय ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

निवडणूक निर्णय कक्ष, स्वीप, प्रशिक्षण व व्यवस्थापन, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ईव्हीएम कक्ष, मतदान, मीडिया, माहिती व्यवस्थापन तक्रार निवारण कक्ष सीव्हीजील, वाहतूक व संपर्क व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, तसेच नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना असलेल्या समस्यांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *