मलउपसा केंद्राचे काम करण्यासाठी जमीनीखाली उतरलेल्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील एसपीएस या केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेल्या मलउपसा केंद्रात खाली उतरून जमीनीखाली काम करणाऱ्या दोन मजुरांचा मृत्यू आणि त्यांना वाचविण्यासाठी खाली उतरलेल्या एका नागरीकाचा असे तीन मृत्यू झाले आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्राप्त झालेल्या माहितीनुसार केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत एसपीएस(मलउपसा केंद्र) कामासाठी नवीन मशनरीची उभारणी करण्याचे काम सुरू असतांना या कामाचे सुपरवायझर शिवराम गंदीगुडे आणि दोन मजुरांनी कामाची सुरूवात केली. मलवाहिनी चेंबर बंद करण्यासाठी दोन मजुर खाली उतरले. त्यांची नावे शंकर माधव वरसवाड(35) आणि राजू व्यंकटी मेटकर(25) असे आहेत. खाली उतरल्यानंतर तेथे तयार होणाऱ्या गॅसमुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुध्द झाले. त्या दोघांच्या बेशुध्दीची बाब लक्षात आल्यानंतर तेथे सुरू असलेले काम पाहत उभे असलेल्या नागरीकांमधील गजानन उर्फ विक्की पुयड (30)हा व्यक्ती त्या दोन मजुरांना वाचविण्यासाठी जबरदस्तीने चेंबरमध्ये उतरला. पण दुर्देवाने तो पण त्या गॅसच्या प्रभावाने बेशुध्द झाला. त्यानंतर अग्नीशमन दलाने या तिघांना बाहेर काढले आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू दवाखान्यात नेण्यापुर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.
कोणतेही काम सुरू करतांना मजुरांची सुरक्षा ही त्या कामाच्या कंत्राटदाराची सर्वात महत्वपुर्ण जबाबदारी आहे. गॅस चेंबरमध्ये खाली उतरत असतांना त्या मजुरांकडे ऑक्सीजन सिलेंडर असणे आवश्यक होते. पण तेथे हजर असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले की, खाली उतरणाऱ्या मजुरांकडे कोणतेही ऑक्सिजन सिलेंडर नव्हते. ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नाही तर त्या मजुरांना खाली कामासाठी पाठविणारा त्या कामाचा कंत्राटदार सुध्दा या मजुरांच्या मृत्यूस जबाबदार आहे. मजुर अडकल्यानंतर त्यांच्या बचावासाठी खाली उतरलेला नागरीक विक्की पुयड याची तर प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. पण आम्ही केलेली प्रशंसा वाचण्यासाठी विक्की पुयड सुध्दा जिवंत नाही. अशा प्रकारची अनंत कामे विविध योजनांना अनुसरून आज नांदेड शहरात अनेक ठिकाणी सुरू आहेत. परंतू कामगारांच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता ही कामे सुरु आहेत. हे प्रत्यक्षात पाहायचे असेल तर शहरात सुरू असणाऱ्या विविध कामांजवळ वातानुकुलीत कक्षात बसून आदेश देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तेथे थांबावे आणि तेथे सुरू असलेले काम पाहावे म्हणजे वास्तव न्युज लाईव्हने खोटे लिहिले आहे असे म्हणण्यासाठी वावच मिळणार नाही.
संबंधीत व्हिडीओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *