कंधार(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये 25 हजारांची लाच स्विकारली या आरोपाखाली सध्या सेवानिवृत्त असलेले आणि तत्कालीन कंधारचे पोलीस निरिक्षक उत्तम सिताराम मुंडे आणि त्यांच्यासोबतच्या दुसऱ्या खाजगी व्यक्तीला कंधार येथील विशेष न्यायाधीश एम.एन. पाटील यांनी आरोपातून मुक्त केले आहे.
सन 2017 मध्ये शेख नैशाद शेख ताहेर यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार ते पुर्वी गुटखा विक्रीचा व्यवसाय करत होते. परंतू त्यांनी तो बंद केला होता तरीपण तत्कालीन कंधारचे पोलीस निरिक्षक उत्तम सिताराम मुंडे यांच्यावतीने कंधार येथील मोहम्मद आयुब सत्तार हा गुटखा विक्रीसाठी लाच मागणी करत होता. दोन महिन्याचे दरमहा 16 हजार रुपये अशी 32 हजारांची लाच मागणी होती. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर दि.5 जून 2017 रोजी कंधार पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षकांच्या शासकीय घरामध्ये उत्तम सिताराम मुंडे आणि मोहम्मद आयुब अब्दुल सत्तार यांना पकडण्यात आले. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 142/2017 दाखल करण्यात आला. पुढे याप्रकरणाचा तपास करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक प्रमोद उलेमाले यांनी न्यायालयात दोषारोपपत् दाखल केले.
ंधार न्यायालयात हा खटला विशेष सत्र खटला एससीबी 4/2018 नुसार सुरू झाला. याप्रकरणात सरकार पक्षाने 4 साक्षीदार तपासले. त्यामध्ये दोषारोपाची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने तक्रारदाराचे नाव चुकीचे लिहिलेले होते, लाचेची मागणी सिध्द झाली नाही, सापळ्यातील पावडर लावलेली 25 हजार रुपये रक्कम उत्तम मुंडे आणि मोहम्मद आयुब या दोघांकडूनही जप्त झाली नाही. पंचनाम एसीबी कार्यालयात करण्यात आला, जप्त झालेली लाचेची 25 हजार रुपये रक्कम प्रमोद उलेमाले यांनी 40 दिवस आपल्या कपाटात ठेवली होती. तसेच मुळ तक्रारदार शेख नौशाद शेख ताहेरविरुध्द सन 2012 मध्ये जीवनावश्यक वस्तु कायद्याचे गुन्हे दाखल झाले होते आणि सन 2024 मध्ये अन्न भेसळ कायद्याप्रमाणे सुध्दा गुन्हे दाखल झाले होते. अशा अनेक बाबी न्यायालयासमक्ष आल्या. न्यायालयाने आलेला पुरावा स्विकारता येणार नाही अशी नोंद निकालपत्रात करून सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक उत्तम सिताराम मुंडे आणि खाजगी व्यक्ती मोहम्मद आयुब मोहम्मद सत्तार या दोघांची मुक्तता केली आहे. या प्रकरणात उत्तम मुंडे यांनी आपली बाजू स्वत: मांडली. मोहम्मद आयुबच्यावतीने ऍड.बेग यांनी काम केले.