नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी जेनवेव’या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे सायंकाळी ७ वाजता हा नाट्यप्रयोग पार पडला. तन्मय ग्रुप, नांदेड यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या नाटकाचे लेखन गोविंद जोशी यांनी केले असून दिग्दर्शन अंकिता देव-जोशी यांचे आहे. ‘कालचे संस्कार, आजचे विचार, उद्याचे भविष्य!’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेले ‘जेनवेव’ हे नाटक तीन पिढ्यांच्या भावविश्वाचा, विचारांचा आणि नातेसंबंधांमधील संवादाचा वेध घेते. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची साधने वाढली असली, तरी माणसांमधील भावनिक जवळीक, संवेदनशीलता आणि नात्यांमधील समजूतदारपणा टिकवून ठेवण्याचे आव्हान अधिक महत्त्वाचे बनले आहे. नव्या पिढीचे विचार, ज्येष्ठ पिढीचे अनुभव आणि मधल्या पिढीची भूमिका यांचा सुरेख संगम या नाटकातून मांडण्यात आला आहे. नाटकातील शुभांगी ही भूमिका वत्सला मोरे, मिताली ही भूमिका शुभांगी कुलकर्णी, तर परी ही भूमिका राजेश्वरी जोशी यांनी साकारली आहे. या तीन पात्रांच्या माध्यमातून पिढ्यांमधील विचारभिन्नता, नात्यांमधील भावनिक गुंतागुंत, तंत्रज्ञानाचे आकर्षण, स्वप्ने, अपेक्षा आणि भविष्याची आव्हाने उलगडण्यात आली आहेत. नाटकाच्या तांत्रिक बाजूची जबाबदारीही कुशलतेने सांभाळण्यात आली. नेपथ्य अभिनव जोशी, प्रकाश योजना विवेक भोगले, रंगभूषा वैशाली गुंजकर, वेशभूषा संध्या संगेवार आणि संगीत कमलेश सारंगधर यांनी सांभाळले. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी प्रेम, विश्वास, संवेदनशीलता आणि माणुसकी या मूल्यांचे महत्त्व कायम राहते. प्रत्येक पिढीचा दृष्टिकोन हा त्या काळातील अनुभवांमधून घडत असतो. त्यामुळे कोणतीही पिढी पूर्णपणे बरोबर किंवा चूक नसून एकमेकांना समजून घेणे आणि परस्परांच्या विचारांचा आदर करणे महत्त्वाचे आहे, हा सकारात्मक संदेश ‘जेनवेव’ या नाटकातून देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 17 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उत्साहात उदघाटन