नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन हायवा ट्रक आणि दहा ब्रास अवैध रेती असा एकूण ८० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान १६ नोव्हेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पहिली कारवाई विष्णुपुरी परिसरात करण्यात आली. वाडीपाटी येथून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहयोग कॅम्प रोडवर सापळा रचून एमएच २६ बीडी ४१०० क्रमांकाचा हायवा ट्रक पकडण्यात आला. चालक गणेश दशरथ गायकवाड (वय ३२, रा. बाभूळगाव, ह.मु. शाहूनगर, सिडको, नांदेड) याच्याकडे रेती वाहतुकीची रॉयल्टी व परवानगी मागितली असता कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा आणि २५ हजार रुपयांची पाच ब्रास रेती असा ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई भगवान बाबा चौक परिसरात करण्यात आली. येथे एमएच २६ बीई ४१०० क्रमांकाचा दुसरा हायवा ट्रक अवैध रेती वाहतूक करताना पकडण्यात आला. या कारवाईतही ४० लाखांचा हायवा आणि २५ हजार रुपयांची पाच ब्रास रेती जप्त करण्यात आली. या प्रकरणी चालक गणेश दशरथ गायकवाड आणि वाहनमालक मधुकर अण्णा दिघे (रा. कारेगाव, ता. लोहा) यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८(७), ४८(८) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक जाधव व गुन्हे शोध पथकाने केली. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन घटनांमध्ये हायवा गाडीचा चालक एकच आहे. म्हणजे एकदा गुन्हा दाखल झाला तरीही बहाद्दर चालक गणेश दशरथ गायकवाड दुसऱ्यांदा अवैद्य वाळूची वाहतूक करण्याची हिम्मत ठेवतो. म्हणजे गुन्हे दाखल होण्या बद्दल गायकवाडला भीती वाटत नाही असेच म्हणावे लागेल. Kanthak Suryatal Post Views: 379 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीसाने नवीन हायवा गाडीची केली पुजा आणि चर्चेला आले उधाण