• जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा • आदिवासी सेवकांचा सन्मान, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आमदार भीमराव केराम यांचे निर्देश नांदेड – आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त किनवट येथे जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरा, संस्कृती आणि अस्मितेचा जागर करत शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. किनवट येथील कार्यक्रमात आमदार भीमराव केराम यांनी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट यांच्या वतीने गोकुंदा येथील के. के. गाडगे येथे जयंती व जनजातीय गौरव दिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी बी. सरवनन यांनी प्रास्ताविकातून 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान आयोजित जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताहाची माहिती दिली. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी सेवकांचा सन्मान आदिवासी समाजाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त नारायण डिसाम, माधवराव मरसकोळे, दादाराव टेकाम आणि भीमराव शिरसाट यांचा प्रकल्प अधिकारी बी. सरवनन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, उपजीविका आणि पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी. योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष आनंद मच्छरवार, साजिद खान, श्रीनिवास नेम्मानिवार, स्वागत आयनेनिवार, उमाकांत कराळे, संतोष मरसकोळे, दत्ता आडे, तुकाराम पेदर, डॉ. धुमाळे, सागर शिंदे, मुन्ना क्षीरसागर, प्रकाश कदम, बालाजी वामणे, जयवंत जाधव, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप नाईक, सुरजुसे, आडे, शेलके, कार्यालय अधीक्षक संदीप कदम, राजू भोंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण, आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरांचा सन्मान आणि विकासाच्या संधी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला. जनजातीय गौरव दिन हा आदिवासी समाजाच्या हक्क, स्वाभिमान आणि सर्वांगीण विकासासाठी सामूहिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला. Kanthak Suryatal Post Views: 245 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निराधार बांधवांच्या चेहऱ्यावर फुलले समाधान ! सोनू दरेगावकर यांच्या पुढाकाराने दिवाळीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप थकीत वेतन व इतर मागण्यांसाठी नायगाव वनीकरण कामगारांचे बेमुदत आंदोलन