नांदेड(प्रतिनिधी) :-माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना एकाच दिवशी उडवून देण्याचा कट तीन वर्षांपूर्वी रचल्याचा खळबळजनक दावा करून एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने मुंबईतून अटक केली आहे. रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे नांदेडच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीने धमकी देताना उल्लेख केलेले ते चार आमदार नेमके कोण, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. नांदेड शहरातील महेश कृष्णाजी तुतारे आणि रवी रोकडे यांची जुनी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत रोकडे हा गेल्या काही दिवसांपासून तुतारे यांना फोन करून पैशांची मागणी करीत होता. १४ नोव्हेंबर रोजी त्याने पुन्हा संपर्क साधत एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकी दिली. तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि नांदेडमधील चार आमदारांना एकाच दिवशी संपविण्याचा प्लॅन केला होता, असा दावा त्याने केला. तसेच आपल्या पाठीशी मोठ्या लोकांचे हात असल्याचे सांगत पैसे न दिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारानंतर महेश तुतारे यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हा शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नांदेडच्या पथकाने पेडर रोड येथील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय परिसरातून रवी उर्फ रवींद्र गौतम रोकडे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पुढील कारवाईसाठी त्याला वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव आणि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकते तसेच सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर आणि दीपक ओढणे यांच्या पथकाने केली. ‘ते चार आमदार कोण?’ चर्चेला उधाण या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधणारा मुद्दा म्हणजे आरोपीने तीन वर्षांपूर्वी अशोकराव चव्हाण यांच्यासह चार आमदारांना एकाच दिवशी उडविण्याचा कट आखल्याचा केलेला दावा. हा दावा केवळ खंडणीसाठी दिलेली धमकी होती की त्यामागे खरोखरच काही गंभीर कटाची पार्श्वभूमी होती, याचा तपास होणे आवश्यक आहे. कारेगाव येथे कथित कटाचे नियोजन झाल्याचा उल्लेखही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. आरोपीने उल्लेख केलेले चार आमदार कोण होते? त्यावेळी या कथित कटाची माहिती कोणाला होती का? या संदर्भात पोलिसांनी यापूर्वी काही तपास केला होता का? तसेच आरोपीच्या दाव्यामागे काही तथ्य आहे की केवळ दहशत निर्माण करून खंडणी उकळण्याचा हा प्रकार होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केली असली, तरी त्याने केलेल्या कथित कटाच्या दाव्याची स्वतंत्रपणे आणि सखोल चौकशी होणे महत्त्वाचे आहे. ‘अशोकराव चव्हाणांसह ते चार आमदार नेमके कोण?’ हा अनुत्तरित प्रश्न आता नांदेडच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. Kanthak Suryatal Post Views: 481 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! राजू यादव यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळावर नियुक्ती