महबूबिया कॉलनी आणि वर्धमाननगरमध्ये घरफोड्या; सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी पळविली

नांदेड (प्रतिनिधी) –  शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत असून, चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बंद घरे लक्ष्य करून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ३६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महबूबिया कॉलनी येथे घडली. दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपासून ते १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या दरम्यान फिर्यादी शेख सुजाज हसनसाब (वय ४६, रा. महबूबिया कॉलनी, नांदेड) यांच्या राहत्या घराच्या कुलूपाची कोंडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४८/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ तेलंगे करीत आहेत.

दुसरी घरफोडी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगर, मालेगाव रोड येथे घडली. दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून ते १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या काळात फिर्यादी सुप्रिया विठ्ठलराव पाटील (वय ३०, रा. वर्धमाननगर, मालेगाव रोड, नांदेड) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील तसेच लोखंडी पेटीतील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६४/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३)(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि वाडेवाले करीत आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणी झालेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!