नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये कालही वाहतूक कोंडी होती आणि आजही परिस्थिती फारशी वेगळी दिसत नाही. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी, वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यांवरील वर्दळ यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत होताना दिसत आहे. दिवाळीच्या काळात गर्दी वाढणार हे अपेक्षित असतानाही वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता आले असते का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. नागरिकांनीही अनावश्यक घाई टाळून वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र, त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेनेही अधिक नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. गर्दीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे योग्य नियमन आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्याची घटना समोर आली. रुग्णवाहिकेतील रुग्णासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रुग्णवाहिकेला तातडीने आणि सुरक्षितपणे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांसह वाहतूक पोलिसांनीही विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. वाहतूक शाखेनेही दिवाळी साजरी करावी, चिवडा, लाडू, चकली आणि बर्फीचा आस्वाद घ्यावा, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, सणासुदीच्या काळात नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न होणे अपेक्षित आहे. दिवाळीचा फराळ महत्त्वाचा आहेच; पण रुग्णवाहिकेला वेळेत रस्ता मिळणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. या परिस्थितीत केवळ प्रशासनाकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही, तर नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. चुकीचे पार्किंग, विनाकारण वाहनांची गर्दी आणि रुग्णवाहिकेला मार्ग न देण्याची वृत्ती टाळली पाहिजे. नांदेडकरांची अपेक्षा एवढीच आहे की, दिवाळीच्या काळात वाहतूक कोंडी ही अपरिहार्यता न ठरता तिच्यावर प्रभावी उपाययोजना व्हाव्यात. वाहतूक शाखेने सणाच्या काळात विशेष नियोजन करून शहरातील प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करावे. कारण दिवाळीचा आनंद सर्वांनी घ्यावा; मात्र त्या आनंदाच्या गर्दीत एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ नये. दिवाळीचा फराळ गोड असावा, पण नांदेडमधील वाहतुकीचा अनुभव नागरिकांसाठी कडू ठरू नये, एवढीच अपेक्षा! Kanthak Suryatal Post Views: 118 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तुमच्या गाडीचे मायलेज का घटले? ८०,००० कोटींचा कंपन्यांना नफा आणि सामान्य जनतेला हजारो कोटींचा फटका! सचखंड श्री हजूर साहिब येथे पारंपरिक तखतस्नान सोहळा उत्साहात